शिक्षकांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान; पोपटराव पवार यांनी काढला यावर हा उपाय
यासाठी काही ठिकाणी विधायक मार्ग शोधण्यात आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी शोधलेला मार्ग. या उपायाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
अहमदनगर : सध्या राज्यात जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी शिक्षकांचाही संप सुरू आहे. या संपाचा परिणाम वेगवेगळ्या क्षेत्रात होत आहे. आरोग्य विभागात शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. महसूल विभागाची काम ठप्प पडली आहेत. शिक्षकही संपावर गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. काळी शिक्षक जुनी पेन्शन लागू व्हावी म्हणून संपावर गेले आहेत. तरी काही शिक्षक शिकवत आहेत. ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षकांअभावी नुकसान होतं, त्यांचं काय, यासाठी काही ठिकाणी विधायक मार्ग शोधण्यात आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी शोधलेला मार्ग. या उपायाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. पाहुयात काही आहे हा उपाय.
अनोख्या उपक्रमाची चर्चा
मात्र यावर अहमदनगरला हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी मुलांचं नुकसान होऊ नये यासाठी थेट शाळा गाठली. स्वतः पुस्तक हातात घेऊन मुलांना शिक्षणाचे धडे दिले. हिवरे बाजार ग्रामपंचायतीच्या या अनोखा उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे. पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श गाव हिवरेबाजार येथे हे काम सुरू आहे.
यांचा शिक्षणासाठी पुढाकार
यात सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी, सोसायटी चेअरमन पालक संघाचे सदस्य आणि गावातील सुशिक्षित पालक विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. तसेच कोविड काळातील फ्रंटलाईन टीम हे संप सुरू झाल्यापासून अध्यापनाचे काम करत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामस्थामार्फत प्राथमिक शाळा सकाळी ७.३० ते ११ आणि माध्यमिक शाळा सकाळी ७.३० ते १२ या वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
विद्यार्थ्यांशी साधता येतो संवाद
गावाला आदर्श करण्यात पोपटराव पवार यांचा मोठा वाटा आहे. अजूनही गावातील लोकं त्यांचं म्हणण ऐकतात. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होत नाही. गावकऱ्यांनाही चांगली संधी मिळते. विद्यार्थ्यांशी संवाद साधता येतो. यात विद्यार्थ्यांचा फायदा होत आहे. प्रत्येक गावी असा उपक्रम राबवल्यास गावातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.