धमक होती तर नवा पक्ष काढायचा होता ना?; अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ललकारलं
बूथ कमिट्या झाल्या नाहीत तर पुढच्या वेळी तिथल्या तिथ घरी बसवेन. सत्ता कधी डोक्यात जाऊ देऊ नका, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं. पक्ष बांधणीसाठी अंग झटकून कामला लागण्याचे आदेशच त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.
कोल्हापूर : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ज्यांच्या वडिलांनी पक्ष निर्माण केला, जो पक्ष महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवला. त्यांचाच पक्ष काढून घेतलं. त्यांचं चिन्ह काढलं. पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने दिलं असलं तरी हे जनतेला पटलंय काय? याचाही विचार झाला पाहिजे. तुमच्यात धमक होती तर काढायचा होता दुसरा पक्ष. कोणी अडवलं होतं तुम्हाला? असा सवाल अजित पवार यांनी केला.
कोल्हापुरात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना अजित पवार यांनी हा सवाल केला. यावेळी त्यांनी पक्षात फेरबदल करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं. मी स्पष्ट सांगतो. पक्ष संघटनेच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे उद्याच्या काळात पक्षात भाकरी फिरवावी लागणार आहे. भाकरी फिरवली जाणार आहे. परवा आमची बैठक झाली. त्यात 25 नेते होते. या बैठकीतही मी सांगितलं. फेरबदल झाले पाहिजे. आमच्यापासूनच आम्ही सुरुवात करणार आहोत, असं सांगतानाच बारामती, पिंपरी, पुणे आणि पुणे ग्रामीणमध्ये नव्या लोकांना संधी देणार आहे, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.
कसल्या याद्या करताय?
महानगरपालिकेच्या निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. तेव्हा आता राज्य ढवळून काढायचं आहे. मला मुख्यमंत्र्यांचा अपमान करायचा नाही. देशाच्या पंतप्रधान मुर्म आहेत सांगतात. कसं सरकार चाललंय? शेतकऱ्यांना 50 हजारांची मदत अजून दिली नाही, कसल्या याद्या करत आहात? शेतकऱ्यांच्या इतक्या समस्या आहेत. सरकार काय करतंय? हे सर्व सामान्यांचे सरकार आहे असं म्हणतात. अरे कशाच सर्वसामान्यांचे सरकार? असा सवाल त्यांनी केला. महिलांना एसटी मोफत करण्यापेक्षा गॅस दर कमी केला असता तर महिलानी डोक्यावर घेतलं असतं, असा टोलाही त्यांनी लगावला.
सत्तेची नशा चढली
राज्यकर्त्यांना जनतेसमोर जायला कोणताच मुद्दा राहिलेला नाही. म्हणून भावानिक मुद्दे समोर आणले जातं आहेत. सत्तेची नशा, मस्ती त्यांच्या डोक्यात चढली आहे. ज्यांनी पक्ष काढला त्यांच्याकडूनच पक्ष काढून घेतला. हिंमत होती तर तुम्हीही नवीन पक्ष काढायचा होता ना?, असा सवाल त्यांनी केला.
तेव्हा मलिक यांना बदनाम केलं
सरकारबद्दल लोकांच्या मनात चीड आहे म्हणूनच सत्ताधारी निवडणूका कारण सांगून पुढे ढकलत आहेत. राज्यकर्त्यांच्या अंगलट एखादी गोष्ट आली की त्याकडे लक्षच देत नाहीत, असं सांगतानाच नवाब मलिक हे समीर वानखेडे बद्दल काय सांगत होते? नवाब मलिक बोलत होते तेव्हा त्यांना बदनाम केलं. द्वेष भावनेतून एखाद्या विरोधात काम करायचं हे महाराष्ट्रात कधी घडलं नव्हतं, असं ते म्हणाले.