Akola Temperature | अकोल्यामध्ये उष्माघाताचा बळी, शेतातून काम करून परतताना शेतकऱ्याचा मृत्यू
अकोला : राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक शहरात उष्णतेची लाट येणार असा इशाराही हवामान खात्याने दिलाय. अशातच अकोल्यामध्ये उष्माघाताचा पहिला बळी ठरला आहे. शेतात काम करून घरी परतत असताना उन्हाचा फटका बसल्यामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. उष्माघाताचा हा जिल्ह्यातील पहिला बळी आहे.
अकोला : शहराच्या तापमानाने रेकॉर्ड ब्रेक केलाय. अकोला हे देशातील दुसऱ्या तर जगातील नवव्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले आहे. आठवड्या भरापासून अकोल्यात तापमानाने (Temperature) उच्चांक गाठला आहे. तापमानाचा पारा 43 अंश सेल्सियसच्यावर पोहोचला आहे. अशातच मंगळवारी उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यात येत असलेल्या सारकिन्ही या गावातील 50 वर्षीय समाधान शिंदे हे शेतातील काम करण्यास गेले होते. शेतात काम करताना समाधान शिंदे (Samadhan Shinde) हे चक्कर येऊन खाली पडले. गावकऱ्यांनी त्यांना तात्काळ दवाखान्यात घेऊन गेले असता डॉक्टरांनी (Doctor) त्यांना मृत घोषित केले. ही धक्कादायक घटना मंगळवारी समोर आल्याने हा उष्माघाताचा जिल्ह्यातील पहिला बळी आहे. त्यामुळे या उन्हात कामानिमित्त घरा बाहेर निघा आणि सोबत पाणी, दुपट्याचा वापर करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
शहरात पाण्याची नासाडी
अकोला शहरात मात्र पाण्याची नासाडी होताना दिसत आहे. अकोला शहरातील डाबकी रोड परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी नाही. पण रस्त्यावर मात्र पाण्याचे लोट वाहत असल्याचे निदर्शनात आले. डाबकी रोडवर मुख्य पाइपलाइन फुटल्याने हजारो गॅलन लिटर पाणी व्यर्थ वाहून गेले. या कडे कोणाचेच लक्ष नसल्याने पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. डाबकीरोडवासी कडकत्या उन्हाळ्यात पुराचा आनंद घेताना दिसत आहेत. 8 मार्चपासून नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही.
नगरसेवक माजी झाल्याने दुर्लक्ष
माजी नगरसेवक कंटाळलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र आहे. अकोला महानगरपालिकेचा जलप्रदाय विभाग या कडे अक्षम्य दुर्लक्ष करतात. थातुरमातुर लिकेज काढण्याचा प्रताप या ठिकाणी करतात. लिकेज काढल्या जातो पण परत दुसऱ्या दिवशी तोच प्रकार या ठिकाणी घडतो. लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर अकोला शहरात नागरिकांना भविष्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागेल. त्यामुळे महानगरपालिकेच्या जलप्रदाय विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.