अंबादास दानवेंचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघात, म्हणाले, दिल्लीसमोर आम्हाला…
दिल्लीच्या समोर पाय चाटायला शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिकवले नाही.
गणेश सोनोने, Tv9 मराठी, प्रतिनिधी, अकोला : शिवसेना (Shiv Sena) पक्षावर आणि धनुष्यबाण या चिन्हावर शिवसेनेच्या शिंदे गटाने दावा केला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हं गोठवलं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत कोणी वर मान करून बोलू नये, असा टोला शिवसेनेला लगावला. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार पलटवार केला आहे.
दानवे म्हणाले की, फडणवीसांची मान ऑलरेडी खाली गेली आहे. शिवसेनेच्या ताकदीवर भारतीय जनता पार्टी मोठी झाली. त्यांचे बोट धरून हे मोठे झाले आहेत. हे शिवसेना फोडण्यासाठी मागच्या तीन वर्षापासून लागलेले आहेत.
कारण शिवसेनेने या महाराष्ट्राला ताठ मानेनं जगायला शिकवले आहे. दिल्लीच्या समोर पाय चाटायला शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिकवले नाही. शिवसेनेला ताठ मानेची भाषा करण्याची गरज नाही, असंही दानवे यांनी म्हंटलं.
अंबादास दानवे म्हणाले, अब्दुल सत्तार ही एक विकृती आहे. ती कुठेही गेले तरी असंच वागणार असल्याचा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अब्दुल सत्तार यांना लगावला आहे.
अंबादास दानवे हे आज अकोला जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी हा टोला लगावला आहे. दानवे हे दोन दिवस अकोला आणि अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
अमृता फडणवीस यांनीही शिवसेनेवर ट्वीटरच्या माध्यमातून टीका केली. चिन्हं हरविलं, आमदार गमावले, भाजपसारखा पार्टनर हरविला. असं ट्वीट त्यांनी केली. त्यावर त्यांना आमची चिंता आम्ही करू, असं सांगा, असा निरोप माध्यमांना अंबादास दानवे यांनी दिला.