आम्ही उंचीपेक्षा कमी माणसांशी बोलत नाही, अमोल मिटकरी यांनी भाजपच्या या नेत्याला लगावला टोला
मी अकोला शहरात राहतो. गेल्या चार वर्षापासून मी खासदार पाहिलाच नाही. या पाच वर्षात खासदारांनी कुठलाही प्रोजेक्ट आणला नाही.
गणेश सोनोने, प्रतिनिधी, अकोला : सत्तेचं गलिच्छ राजकारण करायला भाजपने 2 जूनला हा शिव छत्रपती यांचा राज्यभिषेक सोहळा घेतला आहे. असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लगावला आहे. आम्ही दिलेल्या पत्रालाही त्यांनी केराची टोपली दाखलाचंही मिटकरी म्हणतात. श्री मोहन भागवत यांनी हिंदू राष्ट्र आणि हिंदवी स्वराज्य यातील फरक समजून घेऊन नंतर बोलावे. शिवाजी राजे यांनी निर्माण केलेल राज्य हे कुठल्या एका समाजाचं नसून रयतेचं लोककल्याणकारी स्वराज्य होतं. मोहन भागवत हे नवीन इतिहास संशोधक आहेत.
फरक सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान
माझी त्यांना विनंती आहे की, निवडणुकीच्या तोंडावर भाजपला पाठबळ देण्यासाठी वाद करू नका. जो तुम्ही शोध लावला याचा खुलासा करा. मोहन भागवत यांनी नवीन जावईशोध लावला. त्यामुळे मोहन भागवत यांनी हिंदू राष्ट्र आणि हिंदवी स्वराज्य यातील फरक सिद्ध करून दाखवावा, असे आव्हान अमोल मिटकरी यांनी दिले.
जितेंद्र आव्हाड यांना बदनाम करण्याचे षडयंत्र
जितेंद्र आव्हाड यांच्यावर सिंधी समाज आक्रमक झाला आहे. त्यावर मिटकरी म्हणतात की, भाजपच्या आयटी सेलने जो व्हिडिओ मॉर्फ केला आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जितेंद्र आव्हाड यांना बदनाम करण्याचा षडयंत्र असल्याचाही आरोप यावेळी मिटकरी यांनी केला आहे.
चार वर्षांपासून खासदार पाहिला नाही
सध्या मोदी सरकारला नववर्षे पूर्ण होत आहेत. त्यासाठी भाजपकडून नऊ वर्षात केलेल्या कामाचा आढावा सादर करण्यात येत आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार म्हणाले, मी अकोला शहरात राहतो. गेल्या चार वर्षापासून मी खासदार पाहिलाच नाही. या पाच वर्षात खासदारांनी कुठलाही प्रोजेक्ट आणला नाही. पक्षाचे लोक म्हणतात की ते बिमार आहेत. पक्षाने त्यांच्या पक्षातीलच एखाद्याला खासदार बनवावं, अशी मागणी यावेळी मिटकरी यांनी केली आहे.
नितेश राणे यांचा घेतला समाचार
आमचा चेक बाउन्स नाही होत. असा टोलाही नितेश राणे यांनी मिटकरी यांना लगावला आहे. त्यावर मिटकरी यांनी नितेश राणे यांचा चांगला समाचार घेतला. माझी उंची पाच फूट सहा इंच आहे. माझ्या उंचीपेक्षा कमी उंचीच्या माणसांशी बोलत नसल्याचा टोलाही अमोल मिटकरी यांनी नितेश राणेंना लगावला आहे.