असा मुलगा नको रे बाबा!, आईलाच करावी लागली पोलिसांत तक्रार
शेवटी आईला असला मुलगा नको रे बाबा असं म्हणण्याची वेळ आली आहे. अशा मुलाचं करायचं काय असा प्रश्न तिला पडला.
निलेश डाहाट, प्रतिनिधी, चंद्रपूर : मुलगा चांगला निघाला तर तेच आईवडिलांची खरी संपत्ती असते. पण, काही मुलं आईवडिलांच्या पैशावर डोळा ठेवून असतात. मला हवं ते मिळालं पाहिजे, अशी मुजोरी ते करतात. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. आईला त्रास देणाऱ्या मुलाने घरी चोरी करणे सुरू केले. दारू पिण्यासाठी तो हे सर्व करत होता. आईचे दागिने घेऊन पळ काढला. शेवटी आईला असला मुलगा नको रे बाबा असं म्हणण्याची वेळ आली आहे. अशा मुलाचं करायचं काय असा प्रश्न तिला पडला. शेवटी तिने पोलीस ठाण्यात मुलाविरोधात तक्रार केली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
दारुड्या मुलावर आईला शंका
चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी येथे मद्यपी मुलाने व्यसनपूर्तीसाठी आईचे दागिने चोरले. आपले व्यसन पूर्ण करणाऱ्या मुलाबद्दल आईला शंका आली. तिने घरातील दागिने तपासल्यावर खरा प्रकार उजेडात आला. आई रेवतीदेवी चंदेल हिने आपला मुलगा राकेश विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तातडीने तपास हाती घेत पळून जाणाऱ्या मद्यधुंद अवस्थेतील राकेश चंदेल याला यवतमाळ जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून अटक केली. तपासात जप्त करण्यात आलेले दोन लाखांचे दागिने आई रेवतीदेवी चंदेल यांना सुपूर्द करण्यात आले.
मुलाविरोधात दाखल केली तक्रार
वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये सेवानिवृत्त कर्मचारी असलेल्या आईला आपल्याच मुलाविरुद्ध तक्रार दाखल करावी लागली. अशी माहिती माजरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजितसिंह देवरे यांनी दिली.
देवरे म्हणाले,राकेश हा गेल्या चार-पाच दिवसांपासून दारू पित होता. त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने दागिने लंपास केले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी मुलाचा शोध सुरू केला. तो नाकाबंदीला जुमानला नाही.
पोलिसांनी पाठलाग करून राकेशला सावरला येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. ते दागिने त्याच्या आईला परत करण्यात आल्याचे देवरे यांनी सांगितले.