Chandrapur Ganesh : चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांच्या घरी बाप्पांचे आगमन, राज्यावरील अरिष्टे दूर करण्याची केली प्रार्थना
सुखाचे दिवस दाखव अशी प्रार्थना खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांनी गणरायापाशी केली.
चंद्रपूर : राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपुरातील निवासस्थानी श्री गणेशाच्या आगमनाचा उत्साह पहायला मिळाला. मुनगंटीवार परिवारात गेले 25 पिढ्यापासून मातीच्या मूर्तीची (Ganesh Murthy) स्थापना केली जात आहे. गजानना श्री गणराया ,आधी वंदू तुज मोरया. असे म्हणता तमाम महाराष्ट्रानेच ( Maharashtra) नव्हे तर देश विदेशातही आज गणेश भक्तांनी (Ganesh Devotee) आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा आनंद साजरा केला. चंद्रपुरात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे घरी 25 पिढ्यांपासून मातीची मूर्ती आणून त्याची शेंदूर लावत रंगवून आराधना केली जाते. यंदाही ही परंपरा कायम राहिली. मुनगंटीवार यांनी स्वतः रंगविलेल्या या मूर्तीला 21 पत्र्यांची माळ वाहून साग्र-संगीत पूजा केली गेली. बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण कुटुंब श्री गणेशाच्या भक्तीत न्हाऊन निघाले. श्री सिध्दीविनायक राज्यासमोरील संकटांचे निवारण करो अशी प्रार्थना त्यांनी बाप्पाचरणी केली.
खासदार धानोरकर यांच्या निवासस्थानी झाली गणरायाची स्थापना
चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर आणि त्यांच्या पत्नी वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा येथील निवासस्थानी उत्साहात गणेश पूजन केले. राज्यात सर्वत्र गणेश स्थापनेचा उत्साह असताना धानोरकर यांच्या निवासस्थानी देखील सकाळपासून लगबग होती. श्री गणेशाची सुबक मूर्ती स्थापना करत संपूर्ण विधीद्वारे पूजा- अर्चना व आरती सह गणेशपूजा कुटुंबाने मनोभावे संपन्न केली. मागील दोन वर्षाच्या कोरोना काळात व नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या काळात आपल्या सभोवतालच्या नागरिकांनी अतिव कष्ट सहन केले. यातून बाहेर काढत सुखाचे दिवस दाखव अशी प्रार्थना खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांनी गणरायापाशी केली.
किशोर जोरगेवार यांच्या घरी गणरायाचे आगमन
महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजे गणेशोत्सव. कोरोनाच्या सावटानंतर पहिल्यांदाच निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. चंद्रपुरात देखील सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी देखील वाजत गाजत गणरायाचे आगमन झाले. जोरगेवार कुटुंबीयांनी भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची पूजा अर्चना व आरती केली. कोरोनाच्या सावटानंतर आलेला हा गणेशोत्सव महाराष्ट्रासाठी भरभराट व सुख समृद्धी घेऊन येवो अशी प्रार्थना त्यांनी श्रीगणेशाच्या चरणी केली.