परभणी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशिर्वाद यात्रे दरम्यान शिवाजी पार्कातील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला जाऊन वंदन करणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणेंना बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा अधिकार नाही, अशी टीका केली. याबद्दल केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनीही प्रतिक्रिया दिलीय. नारायण राणे कुणालाही घाबरणार नाहीत, त्यांनी जशी यात्रा काढली तशीच ते यात्रा काढतील. ते कुणाच्याही धमकीला घाबरणार नाहीत. शिवसेनेने काही विरोध केला तर ते शिवसेनेला जशास तसे उत्तर देतील, असं मत कराड यांनी व्यक्त केलं. ते परभणीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोरोना काळात निवडणूक घेऊन मोदींनी देशात हत्याकांड घडवलं, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केली होती. यावर डॉ. भागवत कराड म्हणाले, “नाना पटोले यांनी स्वतःची उंची बघून टीका केली पाहिजे. ते प्रदेशाध्यक्ष झाले म्हणजे स्वतःला मोदींपेक्षा मोठे समजायला लागलेत. ते केवळ 303 सदस्यांपैकी एक सदस्य होते. ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असले तरी त्यांची उंची तेवढीच आहे. मोदी देशाचे नाहीतर जगाचे नेते आहेत. त्यांच्यावर टीका करताना नेत्यांनी आपली उंची बघितली पाहिजे.”
परभणी #जन_आशिर्वाद_यात्रे दरम्यान प्रेस कॉन्फरन्स घेऊन यात्रेचे स्वरूप व जनतेचा उस्फुर्त मिळत असलेला प्रतिसाद याबद्दल प्रतिक्रिया दिल्यात. #drkaradupdates #JanAshirwadYatra pic.twitter.com/yOkbQTMJL1
— Dr Bhagwat Kishanrao Karad (@DrBhagwatKarad) August 19, 2021
“मुंबई येथे बसून नवाब मलिक पत्रकार परिषदा घेत असतात. मोदी आणि फडणवीसांवर टीका करण्याच्या पलिकडे नवाब मलिकांनी काय काम केलं. तुमच्या माध्यमातून माझा त्यांना एक प्रश्न आहे. 2 वर्षांपासून कोव्हीड सुरू आहे. ते कितीवेळा परभणीला आलेत. त्यांनी परभणीसाठी काय केलं? लसीकरण करण्यासाठी सुद्धा राज्यशासन सुरुवातीला धजावलं नाही. म्हणून केंद्राला लसीकरण मोहिमेत हस्तक्षेप करावा लागला,” असं कराड यांनी सांगितलं.
“राज्य सरकार अतिशय बेशिस्तपणे कारभार करीत आहे. येथे जनतेच्या हिताची कामं होत नाहीयेत. केवळ 3 पक्षाच्या नेत्यांना खुश ठेवण्याचे काम सुरू आहे,” असं म्हणत भागवत कराड यांनी राज्यसरकारवर कडाडून टीका केली. पत्रकारांनी परभणी येथील गुत्तेदार रोडचे काम सोडून पळून गेल्याबाबत विचारलं असता त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. निकृष्ट दर्जाचे कामे का होतात, गुत्तेदारांन पैसे का मिळत नाहीत हे अशोक चव्हाणांना विचारा असा टोला कराड यांनी लगावला.
Bhagwat Karad criticize Sanjay Raut and Nana Patole in Parbhani