“सोशल मीडियाच्या माध्यमातून पिल्लू सोडून परिवाराला बदनाम करण्याचं षडयंत्र”; सध्याच्या राजकारणातील हे नेमकं प्रकरण काय?
उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री पदाची गरज नाही अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकच यापूर्वी मुंबईला मुख्यमंत्रीपद मिळालं तर तीन वर्षात महाराष्ट्रात वाटोळे झालं असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
अहमदनगर : गेल्या काही दिवासांपासून राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. त्यातच ठाकरे गट आणि शिवसेनेचा वाद न्यायालयात असल्याने राज्यातील राजकारण आणखी ढवळून निघाले आहे. एकीकडे शिंदे-फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडीचे वाकयुद्ध सुरु असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण वेगळ्याच मुद्याने तापले आहे. खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आज जोरदार टीका केली होती. त्यावर प्रत्युतर देताना अहमदनगरला भाजप खासदार सुजय विखे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेना फुटली आहे, त्यांच्यामुळे शिवसेनेत सध्या कोणी राहिला नाही असा टोलाही सुजय विखे यांनी लगावला आहे.
सध्या राज्यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरू आहेत. मात्र यावर खासदार सुजय विखे यांनी प्रतिक्रिया देताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.
त्यांनी या गोष्टीला षडयंत्र रचले गेले असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, आमच्या परिवाराला बदनाम करण्याचं हे सध्या षडयंत्र सुरू असल्याचं सुजय विखे यांनी सांगितले.
राधाकृष्ण विखे पाटील भावी मुख्यमंत्री अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावरून फिरत आहेत, मात्र त्यावर बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले की, आमचं खरं नेतृत्व राज्यात देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे ही अफवा षडयंत्र म्हणून फिरवली जाते असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
यावेळी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, महसूलची जबाबदारी आमच्यावर असल्यामुळे महाराष्ट्रात काही ठराविक लोकं आहेत. ज्यांना हे पाहवलं जात नाही कारण विखे पाटील यांना एक चांगलं पद मिळालं नाही.
त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून असं पिल्लू सोडले जातं असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच असा चुकीचा मेसेज पसरवण्याचं काम समाजकंटकांकडून केले जात आहे अशी टीकाही त्यांच्याकडून करण्यात आली.
आम्ही ती माहिती घेतली असून त्याचा शोध लावला असल्याचं त्यांनी सांगितलं. तर आम्ही देवेंद्र फडणवीस यांना सगळ्या गोष्टी सांगणार आहोत असा खुलासा त्यांनी केला आहे.
तसेच उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री पदाची गरज नाही अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकच यापूर्वी मुंबईला मुख्यमंत्रीपद मिळालं तर तीन वर्षात महाराष्ट्रात वाटोळे झालं असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.