Special Report : भाजपचं मिशन, शिंदे गटाला टेंशन, लोकसभेसाठी चंद्रपुरातून मिशन ४५ सुरू
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीसमोर ठरलेल्या गोष्टी नाकारणं, हा खंजीर खुपसण्याचा प्रकार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मुंबई : लोकसभेसाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मिशन ४५ सुरू केलंय. भाजपचं मिशन ४५ असेल, तर शिंदे गटाला काय मिळणार असा प्रश्न आहे. जे.पी. नड्डा यांनी २०२४ च्या लोकसभेसाठी मिशन ४५ हे चंद्रपुरातून सुरू केलंय. नड्डा यांच्या चंद्रपूर आणि औरंगाबाद येथे सभा झाल्या. महाराष्ट्रात भाजपच्या भगव्याचा दावा करत उद्धव ठाकरे यांच्यावर जे. पी. नड्डा यांनी जोरदार प्रहार केला. संधी साधत सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी खंजीर खुपसल्याचा आरोपही नड्डा यांनी केला.
जे. पी. नड्डा म्हणाले, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस मंचावर असताना सांगत होते. केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र तेव्हा शिवसेनेचे कार्यकर्ते होते. पण, सत्ता हातात येताना पाहून मनात लाडू फुटले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्याची इच्छा झाली. पाठीत खंजीर खुपसलं. त्यामुळं त्यांनी काँग्रेसशी घरोबा केल्याचा आरोप नड्डा यांनी केला.
नड्डा यांना प्रत्युत्तर देताना अंबादास दानवे म्हणाले, खऱ्या अर्थानं खंजीर भाजपनं शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खुपसलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीसमोर ठरलेल्या गोष्टी नाकारणं, हा खंजीर खुपसण्याचा प्रकार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
लोकसभा निवडणूक जवळ आली. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. २०१९ मध्ये भाजप-शिवसेनेची युती होती. त्यावेळी मोदी लाटेत भाजप सेनेला बंपर लॉटरी लागली. भाजपचे २३ खासदार, तर शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. ४८ पैकी ४१ जागांवर युती जिंकली. आता मिशन ४५ भाजपनं सुरू केलंय. त्यामुळं शिंदे गटाच्या वाट्याला काय असा सवाल विरोधकांकडून विचारला जातोय.