सांगली : अंडा बुर्जी करण्याच्या वादातून एका हातगाडी चालकाची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना सांगलीत उघडकीस आली आहे. संतोष तुकाराम पवार (28 रा. मोती चौक सांगली) असे हत्या करण्यात आलेल्या हातगाडी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसा (Vishrambaug Police)त हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्या संतोषला शेजाऱ्यांनी तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र पोलिसांनी त्याला मृत घोषित केले. आरोपींनी संतोषला मारहाण (Beating) करत हातगाडीची तोडफोड केली आहे. त्यानंतर ते घटनास्थळावरुन फरार झाले.
शंभर फुटी रोडवरील चेतना पेट्रोल पंप नजीक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या समोरच्या बाजूला माऊली एग्ज जंक्शन नावाचा बुर्जीचा स्टॉल आहे. या स्टॉलवर दोन युवक आले होते. या युवकांचा बुर्जी स्टॉलचा मालक संतोष पवार याच्याशी वाद झाला. याच वादातून या दोघांनी बुर्जीच्या गाडीची तोडफोड करण्यास सुरुवात केली. संतोषने याला विरोध केला असता आरोपींपैकी एकाने चाकू काढला आणि संतोषच्या पोटात खुपसला. चाकूने वार केल्यानंतर संतोष जमिनीवर कोसळला. संतोषला खाली पडलेला पाहून आरोपींनी तेथून पळ काढला. शेजाऱ्यांनी तात्काळ जखमी संतोषला वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात नेले मात्र तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांना हत्येची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरिक्षक के. एस. पुजारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून उपस्थितांना सूचना दिल्या. दरम्यान ही हत्या किरकोळ कारणातून झाली की पूर्ववैमनस्यातून याबाबत विश्रामबाग पोलीस तपास करत आहेत. सध्या आरोपींच्या शोधाकरीता पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करीत आहेत. लवकर आरोपींना अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. (Burji stall owner brutally murdered in Sangli for minor dispute)