काजवा महोत्सव पाहून घरी परतत होते, पण घरी पोहचण्याआधी वाटेतच…
सध्या भंडारदरा पाणलोट क्षेत्रात काजवा महोत्सव सुरु आहे. काजवा महोत्सव पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी जमत आहे. हाच काजवा महोत्सव पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर काळाने घाला घातला.
अहमदनगर : काजवा महोत्सव पाहून घरी परतणाऱ्या पर्यटकांवर काळाने घाला घातला. अकोले तालुक्यातील नवलेवाडी शिवारात कोल्हार-घोटी राज्यमहामार्गावर पुणे येथील कुटुंबाच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला असून, यात एका महिलेचा मृत्यू तर चार जण जखमी झाले आहेत. रेखा लाहोटी असे मयत महिलेचे नाव आहे. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळून हा भीषण अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
भंडारदरा येथे काजवा महोत्सव पहायला गेले होते
भंडारदरा पाणलोट क्षेत्रात सध्या काजवा महोत्सव सुरू आहे. काजवे पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. काजवे पाहण्यासाठी रात्री प्रवास करावा लागत असल्याने अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. कालही अकोले-देवठाण रस्त्यावर एका तरूणाचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर पुणे येथील पर्यंटकांच्या कारला अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील चार जण गंभार जखमी झाले असून, त्यांच्यावर संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नगर-कल्याण महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात
पारनेर तालुक्यातील धोत्रे येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नगर-कल्याण महामार्गावर सकाळी साडेसातच्या सुमारास दोन कार आणि एक मालवाहतूक करणारा टेम्पो यांचा अपघात झाला. या अपघातात ईर्टीका कारमध्ये असलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्ती या मुंबईच्या कांदिवली भागातील असल्याची माहिती मिळत आहे.