VIDEO: संजय राऊतांना बॉर्नविटा पिण्याची गरज; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका
संजय राऊत रोज काही ना काही बोलत असतात. बोलून बोलून दमतात. आता त्यांना बोर्नविटा पिण्याची गरज आहे, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. (Chandrakant Patil slams shiv sena leader sanjay raut)
कोल्हापूर: संजय राऊत रोज काही ना काही बोलत असतात. बोलून बोलून दमतात. आता त्यांना बोर्नविटा पिण्याची गरज आहे, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील आज कोल्हापुरात होते. यावेळी त्यांनी मीडियाशी बोलताना ही खोचक टीका केली. संजय राऊत दररोज सकाळी बोलून बोलून दमले, आता नवाब मलिक बोलत आहेत. संजय राऊत आणि मलिक यांच्यामध्येच बोलण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. संजय राऊत यांना बॉर्नविटा पिण्याची गरज आहे, असा टोला पाटील यांनी राऊत यांना लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांना सरकारी रुग्णालय का चालत नाही?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मानदुखीच्या त्रासावर उपचार करून घेण्यासाठी मुंबईतील रिलायन्सच्या हरकिशनदास रुग्णालयात भरती झाले आहेत. त्यावरूनही पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केला. उद्धव ठाकरे यांना सरकारी रुग्णालय का चालत नाही? याचाच अर्थ राज्यातील सरकारी रुग्णालय सुस्थितीत नाहीत हे सिद्ध होतंय. मला वैयक्तिक टीका करायची नाही. पण देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाल्यानंतर ते सरकारी रुग्णालयात दाखल झाले होते, अशी आठवणही पाटील यांनी यावेळी करून दिली.
मलिक यांना गावात फिरू देणार नाही
यावेळी त्यांनी मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नवाब मलिक यांना राज्यातील कोणत्याही गावात फिरू देणार नाही. एनआयएनं मलिक यांना तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे. मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असं सांगतानाच आम्ही चळवळीतील कार्यकर्ते आहोत. त्यामुळे कोणत्याही कारवाईला घाबरत नाही, असंही त्यांनी ठणकावलं.
फडणवीसांनी एकच पत्ता बाहेर काढला
पाटील यांनी या आधीही मलिकांवर टीका केली होती. नवाब मलिकांनी आ बैल मुझे मार हे सुरू केलं आहे. ते स्वत:च खड्ड्यात पडत आहेत. स्वत:ची कबर ते स्वत: खोदत आहेत, असं पाटील म्हणाले होते. तसेच देवेंद्र फडणवीसांनी एकचं पत्ता बाहेर काढला आहे. फडणवीस आणखी पत्ते बाहेर आणतील, असा सूचक इशाराही त्यांनी दिला होता. एसटी कर्मचाऱ्यांबद्दल बोलायचं पण नाही. कुठल्याही मुद्यावर बोललं की राजकारण केलं असं सत्ताधारी म्हणत असतात. पण आम्ही सर्वच मुद्द्यावर बोलत राहणार. ज्यांचं जळतं. त्यालाचं कळतं, असंही ते म्हणाले होते.
संबंधित बातम्या:
अमृता फडणवीसांची नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस, ‘जाहीरपणे माफी मागा, नाहीतर…’
(Chandrakant Patil slams shiv sena leader sanjay raut)