या आजाराने झाला काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचा मृत्यू, ८ वर्षांपूर्वी झाली होती स्थुलतेची शस्त्रक्रिया
गेल्या दोन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. उपचाराला प्रतिसाद देत असल्याच्या बातम्या काल दिवसभर येत होत्या. त्यामुळे ते सुखरूप परत येतील, अशी सर्वांना आशा होती.
निलेश डाहाट, प्रतिनिधी, चंद्रपूर : चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचा वयाच्या ४७ व्या वर्षी मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. २०१४ ला ते आमदार असताना त्यांच्यावर स्थुलतेची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अशा शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही पत्थ्य पाळावे लागतात. आतळ्यामध्ये गुंतागुंत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे कारण समोर येत आहे. नागपुरात शुक्रवारपासून ते भरती होते. शनिवारी किडनी स्टोनचे ऑपरेशन झाले. त्यानंतर आतळ्यात इंफेक्शन असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना एअर अॅम्बुलन्सने दिल्लीतील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते. खासदार बाळू धानोकर यांच्या पार्थिवावर वरोरा येथे उद्या सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तींनी कळवले आहे.
दोन दिवसांपूर्वी हलवले होते दिल्लीत उपचारासाठी
काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. ते 47 वर्षांचे होते. मागील तीन दिवसांपासून ते दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार घेत होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यापूर्वी त्यांच्यावर किडनीसंबंधी आजारासाठी नागपूर येथे उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावत गेल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना एअर एम्ब्युलन्सने दिल्ली येथे हलवण्यात आले.
उद्या सकाळी ११ वाजता होणार अंत्यसंस्कार
गेल्या दोन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. उपचाराला प्रतिसाद देत असल्याच्या बातम्या काल दिवसभर येत होत्या. त्यामुळे ते सुखरूप परत येतील, अशी सर्वांना आशा होती. मात्र आज रात्री सव्वादोन वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पत्नी आमदार प्रतिभा, दोन मुले असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव दुपारी 2 वाजेपर्यंत वरोरा येथे आणले जाईल. उद्या ३१ मे रोजी सकाळी 11 दरम्यान अंतिम संस्कार केले जातील, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली.
पिता-पुत्रांचा चार दिवसांत मृत्यू
चार दिवसांपूर्वीच त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी खासदार धानोरकर हे नागपुरात उपचार घेत होते. पिता-पुत्राच्या लागोपाठ मृत्यूमुळे धानोरकर कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले. दुसरीकडे, एक युवा नेता अकाली गेल्याने राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रतिकूल परिस्थिती असतानाही आपल्या संघटन कौशल्य आणि जनसंपर्काच्या बळावर त्यांनी विजय खेचून आणला होता. त्यांच्या रूपाने काँग्रेसला महाराष्ट्रात खाते उघडता आले.