असाही एक चिमणीप्रेमी; चिमण्यांना वाचवण्यासाठी अशी केली धडपड
या चिमण्यांना तीन किलोहुन अधिक तांदूळ, पाणी व ब्रेड देखील द्यावी लागते. पावसाळ्यात हे खाद्य तब्बल 12 किलोपर्यंत वाढवावे लागते.
चंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा शहरात राहणारे शिवशंकर यादव. वरोरा शहरातील यशोदा नगर भागात त्यांचे घर आहे. शिवशंकर यादव चिमणी प्रेमी म्हणून प्रसिद्ध आहेत. मुक्या पशुपक्ष्यांना वाचविण्यासह स्वतःच्या आत्मिक समाधानासाठी त्यांनी स्वतःच्या घरात 225 लाकडी घरटी तयार करून चिमण्यांना आश्रय दिला आहे. ते स्वतः एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. सध्या कंपनी बंद पडल्याने निम्म्या पगारावर त्यांचा कुटुंब गुजराण करत आहे. मात्र तरीही चिमणी वाचवण्यासाठीचा त्यांचा संघर्ष वाखाणण्याजोगा आहे.
प्रतीघरटी ४५० रुपये खर्च
पावसाळ्या व्यतिरिक्त या चिमण्यांना तीन किलोहुन अधिक तांदूळ, पाणी व ब्रेड देखील द्यावी लागते. पावसाळ्यात हे खाद्य तब्बल 12 किलोपर्यंत वाढवावे लागते. हे सर्व ते आपल्या कुटुंबाच्या मदतीने करत असतात. वाढत्या शहरीकरणामुळे जंगलातील विशिष्ट काडीकचरा आणि कापूस यामुळे बनविले जाणारे चिमणीचे घरटे आता बघायला देखील मिळत नाही. त्यामुळेच प्रतिघरटी साडेचारशे रुपये एवढा खर्च करून शिवशंकर यादव यांनी त्यांचा नवा अधिवास तयार केला आहे.
आसपासच्या नागरिकांचा विरोध
जंगलांची बेसुमार कत्तल व जुने वाडे- घरे मोडकळीस आल्याने चिमणी दिसेनाशी झाली आहे. अशा स्थितीत शिवशंकर यादव यांनी चिमणीबाबत अनोखे हळवेपण दाखविले आहे. आपल्या सेवानिवृत्तीनंतर सुमारे पाच लाख रुपये याच कामी लावण्याचा त्यांचा मानस आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात चिमण्या वास्तव्याला असल्याने आसपासच्या नागरिकांचा याला विरोध आहे.
घरातच 225 लाकडी घरटी
चिमण्यांचे संगोपन, पिलांची आणि जखमी चिमण्यांची शुश्रुषा यासह त्यांचा सांभाळ करून शिवशंकर यादव यांना मोठे समाधान लाभत आहे. चिमण्या आहेत म्हणून आपण आहोत. त्यामुळे मला जे शक्य आहे ते करतोय असेही ते म्हणतात. चंद्रपूरकर चिमणीप्रेमी शिवशंकर यादव यांनी चिमण्यांसाठी घरातच 225 लाकडी घरटी तयार केली.
मुक्या पशुपक्ष्यांवर प्रेम आणि आत्मिक समाधानासाठी स्वखर्चातून बांधलेली घरटी आकर्षण ठरत आहेत. पुढील काळात आर्थिक झळ सोसूनही आणखी शंभर घरटी तयार करण्याचा मानस आहे. पर्यावरणातील वाईट बदलांमुळे आणि मोबाईल मनो-यांनी संकटात आलेल्या चिमणी प्रजातीतील पक्षांना वाचविण्याची धडपड प्रेरक ठरली आहे.