चंद्रपूर : विदर्भात बैल पोळ्याच्या दुसर्या दिवशी लाकडी बैलाची अर्थात तान्हा पोळ्याची धूम असते. खास बच्चेकंपनीचा सण असलेला तान्हा पोळा 27 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. दोन वर्षानंतर हा सण धडाक्यात साजरा होत असला तरी या सणावर महागाईचे सावट पसरले आहे. चंद्रपूरसह विदर्भात बैल पोळ्याच्या दुसर्या दिवशी तान्हा पोळा अर्थात लाकडी बैल पोळा प्रचंड उत्साहात साजरा होतो. या दिवशी लाकडी बैलांची पूजा करून परिसरातल्या मंदिरात संध्याकाळी मोठी मिरवणूक (procession) आयोजित केली जाते. सजवलेल्या मोठं मोठ्या लाकडी बैलांसह घराघरातून बच्चेकंपनी उत्साहात सजावट स्पर्धेत सहभागी होतात. बैल पोळ्या एवढेच विदर्भात तान्हा पोळा अर्थात लाकडी बैलपोळ्याला महत्त्व आहे. दोन वर्षे कोरोनामुळे लाकडी पोळ्याचा उत्साह फिका होता. यंदा दोन वर्षानंतर लाकडी पोळ्याची बाजारपेठ (market) सजली असताना लाकडी बैल व डेकोरेशन (decoration) साहित्याचे भाव गगनाला भिडले आहेत. लाकडी बैल तयार करण्यासाठी लागणारे लाकूड चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यातील कोरीव नक्षी करणारे हात देखील याच भागात आहेत. म्हणूनच चंद्रपूरच्या लाकडी बैलाला महाराष्ट्रभर मागणी आहे.
गेली दोन वर्षे स्पर्धा व सजावट कमी झाल्याने यावर मंदी पसरली होती. मात्र यंदा लाकडी बैल व रंगकाम देखील महागल्याने लाकडी बैलाच्या किमतीही वधारल्या आहेत. तरीही सण उत्साहात साजरा करण्याचा निर्धार कायम आहे, असं लाकडी बैल विक्रेता नाना बुरडकर म्हणालेत. बैल छोटा असेल तरी त्यासोबतची सजावट इतरांपेक्षा सरस ठरावी याकडेच बच्चे कंपनीचे लक्ष असते. म्हणूनच आपल्या बैलाला सजवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करून उत्तम सजावट करण्यात येते. यंदा सजावटीसाठी लागणारे साहित्य देखील महागले आहे. मात्र तरीही लाकडी बैल पोळ्याचा उत्साह कायम आहे.
विदर्भातील प्रत्येक घरात छोटा अथवा मोठा लाकडी बैल असतोच असतो. या लाकडी बैलाची सजावट म्हणजे घरातील सदस्यांसाठी एक वार्षिक आनंद सोहळा ठरतो. एरवी प्रत्येक घरात पारंपारिक रित्या जुनाच लाकडी बैल रंगवून सजविला जातो. मात्र अनेकदा उत्तम सजावटीसाठी आणखी सरस लाकडी बैलाची खरेदी देखील केली जाते. बाजारात महागाईचा आलेख वाढता असताना घरचे बच्चेकंपनीच्या आनंदासाठी अशी खरेदी मुद्दामहून करण्याकडे पालकांचा कल असतो. विदर्भभर छोट्या- छोट्या गावांमधून तान्हा पोळा अर्थात लाकडी पोळ्याच्या सजावटीच्या भल्याथोरल्या स्पर्धा आयोजित करून लहान मुलांच्या कलागुणांना वाव दिला जातो. यंदा जन्माष्टमी देखील निर्बंध मुक्त केल्याने राज्यभर ती उत्साहात साजरी झाली.