दिसला की हाणला, दातओठ खावून लाठ्यांचा मार; गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात काय घडलं?
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा काल नगरमध्ये कार्यक्रम होता. यावेळी तरुणांनी चांगलाच गोंधळ घातला. या गोंधळी तरुणांना पोलिसांनीही चांगलाच चोप दिला आहे.
नगर : सबसे कातील असलेल्या गौतमी पाटील हिच्या प्रत्येक कार्यक्रमात धिंगाणा हा होतोच होतो. गौतमीचा एकही असा कार्यक्रम नाही की त्यात प्रेक्षकांनी गोंधळ घातला नाही. आणि एकही असा कार्यक्रम नाही की त्यात प्रेक्षकांना लाठ्यांचा मार खावा लागला नाही. प्रत्येक कार्यक्रमात तिच्या चाहत्यांना काठीचा प्रसाद पडतोच पडतो. काल नगरमध्येही गौतमी पाटीलचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात नेहमीप्रमाणे प्रेक्षकांनी गोंधळ घातला. त्यामुळे पोलिसांना तिच्या चाहत्यावर लाठीमार करावा लागला. जो दिसेल त्याला लाठ्यांचा प्रसाद दिला जात होता. दातओठ खाऊन या गोंधळ घालणाऱ्यांना चांगलाच चोप देण्यात आला.
नगरमध्ये अनाथ मुलांच्या वसतिगृह उभारणीसाठी निधी गोळा करण्याकरिता गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती. स्टेजच्या भोवती बॅरिकेड्स लावण्यात आले होते. शिवाय हातात काठ्या घेऊन पोलीस स्टेजच्या आसपास फिरत होते. गौतमीचा कार्यक्रम सुरू होताच तरुणांनी एकच गोंधळ घातला.
शिट्ट्या, टाळ्या, किंचाळणे आणि जागेवरच नाचणं सुरू झालं. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. या तरुणांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. दिसेल त्याला चोप देण्यात येत होता. जो जागेवर बसला नाही, त्यालाही जागेवर बसण्यासाठी चोप दिला जात होता. पपब्लिकमध्ये घुसून पोलीस लाठीमार करत होते. एकजण तर दातओठ खाऊन लाठीमार करताना दिसत होता. मात्र, पब्लिक जागेवरून हटायला तयार नव्हती. गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी मार खाऊनही एकाच जागी होते.
वन्स मोअर… वन्स मोअर
गौतमीच्या प्रत्येक गाण्यासाठी वन्स मोअर होत होता. गाणं संपताच वन्स मोअर… वन्स मोअरचा आवाज होत होता. त्यामुळे अधिकच गोंधळ झाला होता. काही तरुण तर जागेवरच उभं राहून नाचत गोंधळ घालत होते. या सर्वांवर पोलीस नजर ठेवून होते. तर काहींना प्रसादही देत होते.
इतरांनीही मदत करा
सामाजिक कामासाठी निधी गोळा करायचा आहे. अनाथ विद्यार्थ्यांसाटी वसतिगृह बांधायचं आहे. अनाथ मुलांसाठी कार्यक्रम ठेवला हे चांगलं आहे. आम्ही जेवझढी मदत होईल तेवढी करू. इतरांनीही मदत करावी हे आवाहन आहे, असं गौतमी पाटील म्हणाली.
बरं वाटलं
गौतमीचा व्हिडीओ व्हायरल करणारा मुलगा पकडला गेला आहे. त्यावरही तिने प्रतिक्रिया व्यक्त केली. तो लहान मुलगा आहे. 17 वर्षाचा आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुणे पोलिसांचे आभार मानते. एकाला पकडलं. अजून दोघं तिघे आहेत. कोणी तरी एक सापडला बरं वाटलं, असं ती म्हणाली.
अफवा पसरवू नका
यावेळी तिने तमाशा कलावंत रघुवीर खेडेकर यांच्या आरोपांना उत्तर दिलं. मी भरमसाठ फी घेते असं ते म्हणाले. माझं एकच म्हणणं आहे. मी कार्यक्रमासाठी ज्याच्याकडून पाच लाख रुपये घेतले त्या व्यक्तीला समोर आणा. काहीही गैरसमज करू नका. माझी फी एवढी नाही. माझा लावणीचा कार्यक्रम नाही. हा डीजे शो आहे, असं ती म्हणाली.