छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या छिंदमच्या अडचणी वाढल्या, फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर दोषारोपपत्र दाखल
श्रीपाद छिंदमच्या अडचणीत वाढ झाली आहे. छिंदम याच्या विरोधात आज अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमच्या (Shripad Chindam) अडचणीत वाढ झाली आहे. छिंदम याच्या विरोधात आज (19 जुलै) अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. फोनवरून शिवीगाळ करणारा आवाज हा श्रीपाद छिंदम याचाच असल्याचा अहवाल फॉरेन्सिक लॅबने दिला आहे. 2018 च्या फेब्रुवारी महिन्यात छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यं केलं होतं. (Charge sheet filed against Shripad Chindam who used abusive words against Chhatrapati Shivaji Maharaj)
दोषारोप पत्र दाखल, तो आवाज छिंदमचाच
मिलालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदम याच्याविरोधात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. तसेच 2018 साली व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगमधील आवाजही छिंदम याचाच असल्याचे समोर आले आहे. तसा अहवाल फॉरेन्सिक लॅबने दिला आहे. या सर्व गोष्टीमुळे छिंदम याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
नेमके प्रकरण काय आहे ?
श्रीपाद छिंदम याने फेब्रुवारी 2018 मध्ये अहमदनगर महानगरपालिकेचे अधिकारी अशोक बिडवे यांना फोन केला होता. बिडवे त्यावेळी महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कर्मचारी होते. यावेळी छिंदम याने बिडवे यांना फोनवर शिवीगाळ केली. तसेच पुढे बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. याच वक्तव्याची कॉल रेकॉर्डिंग नंतर समोर आली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर समस्त महाराष्ट्रातून छिंदम याच्याविरोधात रोष व्यक्त केला जात होता. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
छिंदमविरोधात आणखी एक गुन्हा
दरम्यान, एका टपरी चालकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ तसेच दमदाटी करत जातीवाचक शिव्या दिल्याप्रकरणी याच श्रीपाद छिंदम (Shripad Chhindam) वर 16 जुलै 2021 रोजी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. छिंदमसह 4 जणांविरुद्ध पोलिसात हा गुन्हा नोंदवण्यात आला. अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीसह विविध कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला.
इतर बातम्या :
शिवरायांबद्दल बरळणारा श्रीपाद छिंदम दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार