बुलडाणा : जिल्ह्यासह चिखली (Chikhali) तालुक्यात काल मुसळधार पाऊस झाला. यामुळे शहरातील नाल्यांमधून पाणी वाहायला लागले. मात्र विकासकामांच्या बाबतीत निर्लज्ज असलेल्या चिखली नगर परिषदेने (Municipal Council) शहरातील नाल्यांची मान्सून पूर्व साफसफाई केली नाही. त्यामुळं पावसाच्या पाण्याने नाल्या ब्लॉक झाल्या. त्यामुळं नालीतील पाणी रस्त्यावर आले. काही ठिकाणी नालीतील पाणी थेट अंडर ग्राउंड असलेल्या दुकानात घुसले. यामुळे दुकान घाण पाण्याने भरलेत. दुकानातील साहित्य भिजले. नगर परिषदेच्या चुकीच्या कारभारामुळे याचा फटका दुकानदार लोकांना बसला. त्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. नुकसान झालेल्या दुकानदारांनी (Shopkeeper) नगर परिषदेच्या आरोग्य विभागाला अनेकवेळा सांगितले. तरीही नगर परिषदेनं नाल्यांची स्वच्छ्ता केली नाही. त्याचा परिणाम काल समोर आला. आता यामुळे रोगराई सुद्धा पसरण्याची शक्यता आहे.
पहिल्याच पावसात चिखली नगर परिषदेचे पितळ उघडं पडलं. आता दुकानात शिरलेलं पाणी मोटार लावून काहींनी बाहेर काढलं. नगर परिषदही स्वच्छतेच्या कामाला लागली. नाल्यांमध्ये साचलेला गाळ उपसायला सुरुवात झाली आहे. आधीच नाल्यांमधील गाळ काढला असता तर कदाचित नगर परिषदेवर आता स्वच्छता करण्याची वेळ आली नसती. दुकानदारांचं नुकसान झाल्यानंतर नगर परिषद कामाला लागली आहे. त्यांनी कर्मचारी लावून नाल्यांच्या सफाईचं काम सुरू केलं आहे.
नागपुरात समाधानकारक अशा पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांना पेरणीसाठी तयारी करा, अशा एकप्रकारे सूचना पावसाने दिल्या. मात्र काल नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात वादळी वारे आणि विजांचा कडकडाटासह पाऊस झालां. त्यामध्ये वेगवेगळ्या तीन ठिकाणी वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला. एका बैलजोडीचा सुद्धा मृत्यू झाला. पाऊस आल्याने शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. शहराचा विचार केला तर उकाड्याने त्रस्त असलेल्या नागपूरकरांसाठी वातावरणात गारवा निर्माण झाला. उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. मान्सून थोडा लेट जरी आला असला तरी सुरुवातीला रिमझिम पाऊस झाला. शेतकऱ्यांच्या पेरणीनं वेग घेतला आहे.