व्यापारी-पोलीस आमनेसामने, प्रचंड गदारोळ, कोल्हापूर पोलिसांनी गोंधळ कसा निवळला, तोडगा नेमका काय?
दोन दिवसात परवानगी न मिळाल्यास यापुढे चर्चा सुद्धा होणार नाही, असा आक्रमक पवित्रा आता कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी घेतलाय (Clash between Police and traders in Kolhapur).
कोल्हापूर : अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा व्यतिरिक्त अन्य दुकाने उघडण्यावरून आज (28 जून) कोल्हापुरात प्रशासन आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. चौथ्या स्तरावरील निर्बंध लागू असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात आज कोणत्याही परिस्थितीत व्यवसाय सुरू करणार, अशी भूमिका घेत व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला. व्यापाऱ्यांचा जिल्हा प्रशासनाने विरोध केल्याने वादाची ठिणगी पडली. पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली. अखेर पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी प्रशासनाला दोन दिवसांची मुदत दिलीय. दोन दिवसात परवानगी न मिळाल्यास यापुढे चर्चा सुद्धा होणार नाही, असा आक्रमक पवित्रा आता कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी घेतलाय (Clash between Police and traders in Kolhapur).
जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाला व्यापाऱ्यांचा विरोध
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी अजूनही कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 16 टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी चौथ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. यामध्ये जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवेतील दुकानं व्यतिरिक्त सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या आदेशाला आता व्यापारी संघटनांचा मात्र जोरदार विरोध होऊ लागला आहे (Clash between Police and traders in Kolhapur).
कोल्हापुरात नेमकं काय घडलं?
गेल्या तीन महिन्यांपासून अधिक काळ बंद असलेली दुकानं कोणत्याही परिस्थितीत उघडणार, अशा आक्रमक पवित्र्यात आज कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकानं उघडण्याचा प्रयत्न केला. याला महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने विरोध केल्यान व्यापारी आणि प्रशासनमधील संघर्ष चांगलाच वाढला. सकाळी शहरातील महाद्वार रोड बाजारात या व्यापाऱ्यांनी एकत्र येत प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईला विरोध केला. यावरून अधिकारी आणि व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली. यावेळी कारवाई झाली तरी दुकान उघडणारचं असा सामूहिक निर्धार करण्यात आला. याचवेळी शासनाच्या चुकीच्या निकषांच्या फटका व्यापाऱ्यांना बसत असल्याचा आरोप त्यांनी केला.
व्यापाऱ्यांची काहिशी मनधरणी करण्यात पोलिसांना यश
दुकान बंद असले तरी लाईटबील कामगारांचे पगार विविध कर सुरू असल्यान कोल्हापुरातील व्यापारी आक्रमक झाले. जवळपास तासभर झालेल्या गोंधळानंतर अखेर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस प्रशासन आणि व्यापारी संघटनांची बैठक झाली ज्यामध्ये व्यापाऱ्यांची समजूत काढण्यात पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांना काही प्रमाणात यश आलं. या बैठकीनंतर व्यापाऱ्यांनी प्रशासनाला दोन दिवसांची मुदत दिली आहे. या दोन दिवसात परवानगी द्या. त्याचबरोबर ग्रामीण आणि शहरी भागासाठीचे नियम वेगवेगळे करा, अशी आग्रही मागणी व्यापारी संघटनांनी केली ज्याला प्रशासनानेही मूकसंमती दिली.
प्रशासनाला फक्त दोन दिवसांचा वेळ दिलाय, व्यापाऱ्यांची भूमिका
पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर व्यापारी संघटनांनी तुर्तास दुकान उघडणार नसल्याचं जाहीर केलं असलं तरी दुसरीकडे या संघटनांनी केवळ दोनच दिवसाचा वेळ प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे प्रशासनाला ही यावर सारासार विचार करून तोडगा काढावा लागणार आहे. अन्यथा पुन्हा एकदा व्यापारी आणि प्रशासन आमनेसामने येणार आहेत.
व्हिडीओ बघा :
हेही वाचा : अहमदनगर महापौर निवडणूक, शिवसेनेचा अर्ज, राष्ट्रवादीचा उपमहापौरपदाचा उमेदवार अद्यापही गुलदस्त्यात