कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री मदत जाहीर करणार, ठाकरे सरकारमधील बड्या मंत्र्याची माहिती, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा
महाराष्ट्राच्या येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत चर्चा होईल व त्यात काय स्वरूपात व कशी मदत करायची याची घोषणा मुख्यमंत्री स्वतः करतील, अशी महत्त्वाची माहिती ठाकरे सरकारमधील कॅबीनेट मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
उस्मानाबाद : महाराष्ट्राच्या येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत चर्चा होईल व त्यात काय स्वरूपात व कशी मदत करायची याची घोषणा मुख्यमंत्री स्वतः करतील, अशी महत्त्वाची माहिती ठाकरे सरकारमधील कॅबीनेट मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. येत्या आठवड्यात मदतीच्या पॅकेजची घोषणा होऊ शकते, असं अमित देशमुख यांनी सांगितलं. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
आकडेवारी जमा करणे सुरू आहे, शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे व त्याला मदत करण्याची सरकारची भूमिका आहे. शेतकऱ्यांनी चिंता करु नये, शासन शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी शासन तत्पर आहे, असं मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं.
विमा धोरणात बदल करण्याची गरज
विमा धोरणात सुधारणा करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ दिल्लीत चर्चा करण्यासाठी जाणार आहोत. शेतकऱ्यांना विमा कंपन्या दाद देत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विमा कंपन्या दाद देत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करावी लागेल, असंही मंत्री देशमुख म्हणाले.
विरोधकांनी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मदत आणावी
आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी राज्य व केंद्र यांनी मदत करावी. विरोधकांनी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना कसे मदत होईल हे पाहावे, असा टोला त्यांनी विरोधी पक्ष भाजपला लावला. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली तर बरे होईल, असंही सांगायला ते विसरले नाहीत.
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही
मराठवाङ्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असुन उस्मानाबाद जिल्ह्यात जवळपास तीन लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. शासन लवकरात लवकर पंचनामे करत असुन लवकरच पिक विमा व शासकीय भरीव मदत करेल , शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं अमित देशमुख यांनी उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे पाहणीवेळी सांगितलं. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण , जिल्हाध्यक्ष धीरज पाटील उपस्थित होते.
हिरवीगार शेती उद्धवस्त, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, मदतीकडे नजरा
शेती, रस्ते, जनावरे, घरांची पडझड झाली असून पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास या अतिवृष्टीने हिरावून घेतला आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी असून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जात असले तरी मदत लवकर मिळाली तरच खऱ्या अर्थाने त्यांना दिलासा मिळणार आहे. केंद्र व राज्य सरकारने एकमेकांकडे बोट न दाखविता आणि राजकारण, आरोप प्रत्यारोपात वेळ वाया न घालता भरीव मदत करणे गरजेचे आहे.
(CM Uddhav Thackeray will announce help in the cabinet For Rain Flood Affected Farmer Says maharashtra Minister Amit Deshmukh)
हे ही वाचा :