काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार व्हेंटिलेटरवर; कुटुंबीयांनी दिली प्रकृतीची मोठी अपडेट
बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर हे काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार आहेत. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
चंद्रपूर : राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्ली येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असले तरी त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. तसेच धानोरकर हे उपचाराला प्रतिसाद देत असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन धानोरकर यांच्या कुटुंबीयांनी केलं आहे.
चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर दिल्लीच्या वेदांता रुग्णालयात उपचार घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी ते नागपुरात खासगी इस्पितळात दाखल झाले होते. शस्त्रक्रियेनंतर गुंतागुंत झाल्यावर त्यांना एअर ॲम्बुलन्सद्वारे दिल्लीत हलविण्यात आले. त्यांच्या आतड्यांवर सूज असल्याची प्राथमिक माहिती असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. खासदार धानोरकर उपचारांना प्रतिसाद देत आहेत. त्यांची पत्नी आणि वरोरा विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह दोन्ही मुले देखील दिल्लीत आहेत. खासदार धानोरकर यांचे निकटवर्तीय दिल्लीत दाखल झाले आहेत.
अफवांवर विश्वास नको
धानोरकर वेदांता रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असले तरी ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत. त्यांची प्रकृती सुधारत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयातून करण्यात आलं आहे.
वडिलांचे निधन आणि स्वत: आजारी
धानोरकर यांचे वडील नारायण धानोरकर यांचे काल 27 मे रोजी निधन झालं. त्याच्या मूळगावी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यातच बाळू धानोरकर यांचीही तब्येत बिघडल्याने कालच त्यांना दिल्लीतील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
कोण आहेत धानोरकर?
बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर हे काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार आहेत. मोदी लाटेतही चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले आहेत. धानोरकर यांचा जन्म यवतमाळमध्ये 4 मे 1975 रोजी झाला. कला आणि कृषी शाखेचे त्यांनी शिक्षण घेतलेले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी कपड्याचे दुकान टाकून आपल्या रोजीरोटीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी वाहन खरेदी करणाऱ्या कर्जपुरवठा देणारी कंपनी सुरू केली. मधल्या काळात त्यांनी भद्रावतीत बारही सुरू केला होता.
शिवसेनेतून काँग्रेसमध्ये
बाळू धानोरकर हे आधी शिवसेनेत होते. चंद्रपूरमधील वरोरा विधानसभा मतदारसंघातून ते शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला अन् लोकसभेवर निवडून गेले.