त्यांनी काय राजकारण करायचं ते करावं… नाना पटोले असं का म्हणाले?
अजित पवार भाजपसोबत जाणार की नाही या प्रश्नांपेक्षा राज्यातील प्रश्न आणि जनतेच्या हिताचं राजकारण आणि काम केले पाहिजे असं काँग्रेसने सांगितले.
अकोला : सध्या राज्यातील राजकारण वेगवेगळ्या मुद्यांनी गाजत आहे, एकीकडे शिवसेना आणि ठाकरे गट आक्रमक होत असतानाच दुसरीरकडे अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावरून राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार 40 आमदारांसोबत भाजपबरोबर जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच त्यावर अजित पवार यांनी स्पष्ट मत मांडत मी भाजपसोबत वगैरे जाणार नसून त्या अफवा पसरवल्या जात असल्याचे सांगत त्याविषयावर त्यांनी पडदा पाडला आहे. अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदारांवरून आता राजकारण तापलेले असतानाच काँग्रेसनेही आपली भूमिका मांडत अजित पवार असा निर्णय घेणार नाहीत असा विश्वासही काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 40 आमदार सोबत घेऊन भाजप सोबत सत्ता स्थापन करणार असा स्वरूपाच्या चर्चा चालू असतानाच स्वतः अजित पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझ्याबाबत पसरवला जाणाऱ्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही.
कारण राष्ट्रवादीचे आमदार मला कामानिमित्त भेटण्यासाठी आले होते, त्यामुळे भाजपसोबत जाण्याचा कोणताही सध्या विचार नाही असं स्पष्टीकरण दिल्याने आता काँग्रेसनेही त्यांच्याविषयी विश्वास व्यक्त केला आहे.
काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी अजित पवार यांच्याविषयी बोलताना सांगितले की, आम्ही सकाळी सांगितलं होतं ते जाणार नाहीत हा आमचा विश्वास आहे असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना म्हणाले की, राज्यात सध्या अनेक विषय आहे. अवकाळी आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. महागाई, बेरोजगारीचे प्रश्न राज्यात आहेत. त्यामुळे मूळ बातम्यांना डायव्हर्ट करुन अशा चर्चा उठवल्या जातात असा घणाघातही त्यांनी भाजपवर केला आहे.
राज्यातील समस्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, तरुणांना रोजगार, शेतीचे प्रश्न आणि महागाई कमी करुन लोकांना न्याय दिला पाहिजे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
अजित पवार यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर त्या प्रश्नाला तेच उत्तर देऊ शकतील असं स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले. त्याच बरोबर भाजपमध्ये जाण्याच्या प्रश्नाला अजितदादाच उत्तर देऊ शकतील असंही स्पष्टपणे त्यांनी सांगितले.
नाना पटोले यांनी अजित पवार भाजपसोबत जाणार नाहीत असा विश्वास व्यक्त करत आम्ही सगळी महाविकास आघाडी सोबतच आहोत, कारण भाजप विरोधातील ज पक्ष आहेत ते आम्ही एकत्र आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अजित पवार भाजपसोबत जाणार की नाही या प्रश्नांपेक्षा राज्यातील प्रश्न आणि जनतेच्या हिताचं राजकारण आणि काम केले पाहिजे असं नाना पटोले यांनी सांगितले.