चंद्रपूर : शहरालगत दुर्गापूर (Durgapur), ऊर्जानगर नेरी व कोंडी या परिसरात मागील काही महिन्यांमध्ये वाघ व बिबट या हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात अनेक नागरिकांचा जीव गेलाय. अनेक नागरिक जखमी देखील झालेत. वाघ व बिबट यांच्या सतत होत असलेल्या हल्ल्यामुळे या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात भयभीत होते. आता वनविभागाच्या वतीने त्यावर उपाययोजना केली जात आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक नागरिकांचा जीव गेल्यानंतर गावातील नागरिकांनी वनविभागाप्रती (Forest Department) रोष व्यक्त केला होता. वनविभागाने तात्काळ उपाययोजना कराव्या अशा मागण्या केल्या होत्या. ज्या भागात झुडपी जंगल वाढलेले होते ते सर्व प्रथम कोळसा खाण प्रशासन (Mines Administration) व ग्रामपंचायतीने ते जंगल साफ करावे, याकरिता स्थानिक आक्रमक होते.
पाठपुरावा केल्यानंतरसुद्धा कोळसा खाण प्रशासनाने साफसफाई केली नाही. एका आठ वर्षाचा मुलाचा बळी गेल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी आंदोलकांसह कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यानंतर लगेच या संपूर्ण परिसरातील जागेची तात्काळ साफसफाई झाली. बिबट्याचा सर्वाधिक वावर वेकोली परिसरालगत असलेल्या नेरी, कोंडी व दुर्गापूर येथील वार्ड क्रमांक 1, 2 व 3 या भागात जास्त प्रमाणात दिसून येत होता. या भागातील कचरा सर्वप्रथम स्वच्छ करण्यात आला.
आता या भागाला चंद्रपूर वनविभागातर्फे जवळपास 1.25 किलोमीटर लांबीच्या या परिसराला सौर दिव्यांसह 15 फूट उंच अशा जाळीने वेढण्यात येत आहेत. त्यामुळं या जंगलसदृश्य भागाला लागून असलेल्या परिसरातून बिबट्याला या मानवी वस्तीत येणे शक्य होणार नाही. यामुळे या भागातील सर्वसामान्य नागरिक मात्र सुरक्षित होईल. या जाळी बांधकामामुळे काही प्रमाणात तरी या वन्यप्राण्यांपासून गावातील नागरिकांचे संरक्षण होणार आहे. स्थानिकांनी तसेच आंदोलक नेते नितीन भटारकर यांनी वनाधिका-यांचे आभार मानले आहेत. या संरक्षक जाळीमुळं बिबट्या गावात येणार नाही, याची व्यवस्था करण्यात आली. यामुळं गावकरी आनंदित आहेत. पण, कुठं कुठं जाळी लावणार आणि किती वन्यजीवांना लगाम ठेवणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.