Darshana Pawar Case : आरोपीला आमच्या ताब्यात द्या, नाही तर मारून टाका; दर्शना पवार हिच्या आई आणि भावाची संतप्त प्रतिक्रिया
दर्शना पवार हिची हत्या झाल्यानंतर अखेर पाच दिवसाने तिचा मारेकरी पोलिसांना सापडला आहे. त्यानेच दर्शनाची हत्या केल्याचं उघड झालं आहे. तर आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी दर्शनाच्या कुटुंबीयांनी केली आहे.
नगर : एमपीएससीच्या परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवार हिचा मारेकरी राहुल हंडोरे अखेर पाच दिवसानंतर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. राहुल यानेच दर्शनाची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. या हत्येमागचं कारणही समोर आल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. राहुल हंडोरेला अटक झाल्याची माहिती मिळताच तिच्या कुटुंबीयांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आरोपीला आधी आमच्या ताब्यात द्या. नाही तर त्याला मारून टाका, असा टाहोच तिच्या कुटुंबीयांनी फोडला आहे.
दर्शना पवार हत्या प्रकरणातील आरोपी राहुल हंडोरेला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या अटकेची माहिती मिळाल्यानंतर दर्शनाच्या भावाने संतप्त मागणी केली आहे. त्याने माझ्या बहिणीचा घात केला आहे. त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या. अन्यथा मारून टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया दर्शना पवारच्या भावाने दिली आहे. दर्शनाच्या हत्येने तिचे कुटुंबीय पुरते हादरून गेले आहेत. काय करावे हेच त्यांना कळत नाहीये. हे कसं झालं? असा सवाल त्यांना छळत आहे. तर दर्शना आपल्यात नाही या कल्पनेनेच त्यांना वेडंपिसं केलं आहे.
मीच न्याय देवू शकते
दर्शनाच्या आईनेही मुलीच्या निधनाने आकांत केला आहे. माझ्या मुलीचे जसे तुकडे केले तसे त्याचे करू द्या. मला माझ्या मुलीला न्याय द्यायचा आहे आणि तो मीच देवू शकते. माझी मुलगी गेलीय. तशा इतरांच्या मुली जावू नये. आरोपीला आमच्या ताब्यात द्या नाहीतर फाशी द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया दर्शनाच्या आईने दिली आहे.
सकल मराठा समाजाचं आंदोलन
दरम्यान, दर्शनाची हत्या झाल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. दर्शनाच्या हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाने आज कोपरगावात मोर्चाचं आयोजन केलं आहे. आंदोलकांनी कोपरगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केलं. दर्शनाची हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या. हा खटला जलदगती न्यायालयात चालवा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणा दिल्या. या ठिय्या आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
काय घडलं?
तब्बल आठ दिवस बेपत्ता असलेल्या दर्शनाचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी सापडला होता. तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. त्यात तिचा खून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं होतं. तसेच पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागलं होतं. त्यात दर्शना आणि राहुल हंडोरे हे बाईकवरून जाताना दिसत होते. त्यामुळे राहुल यानेच तिची हत्या केल्याचं उघड झालं होतं.