तुमच्यापेक्षा राज ठाकरे यांच्या सभेला जास्त गर्दी जमते; एकेकाळच्या सहकाऱ्यानेच उद्धव ठाकरे यांची उडवली खिल्ली
दीपक केसरकर कुटुंबासह शिर्डीला आले होते. साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर केसरकर यांनी मीडियाशी संवाद साधला. तुमच्यापेक्षा जास्त गर्दी राज ठाकरेंच्या सभेला जमते. पण ते कुणाला चोर म्हणत नाहीत.
शिर्डी : रत्नागिरीतील खेडमध्ये काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. पक्ष आणि चिन्ह दोन्ही गेल्यानंतरची उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच सभा होती. या सभेला किती गर्दी जमते? उद्धव ठाकरे यांना पक्ष फुटल्यानंतरही पूर्वीसारखाच प्रतिसाद मिळतो का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र, पक्ष फुटला तरी आपला दरारा कायम आहे, आपल्या नावावर आजही गर्दी जमते हे कालच्या उद्धव ठाकरे यांच्या सभेने दाखवून दिलं. उद्धव ठाकरे यांच्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या या सभेची राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खिल्ली उडवली आहे. तुमच्यापेक्षा राज ठाकरे यांच्या सभेला जास्त गर्दी जमते, अशी खोचक टीका दीपक केसरकर यांनी केली आहे.
दीपक केसरकर कुटुंबासह शिर्डीला आले होते. साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर केसरकर यांनी मीडियाशी संवाद साधला. तुमच्यापेक्षा जास्त गर्दी राज ठाकरेंच्या सभेला जमते. पण ते कुणाला चोर म्हणत नाहीत. तुम्हाला टिकवता आलं नाही म्हणजे ते कुणीतरी चोरलं अशा भ्रमात राहू नका. जनतेनं भाजप-सेना युती म्हणून मतदान केलेलं होतं. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणं बाळासाहेबांच्या कुटुंबियांना शोभण्यासारखं नाही, अशी खोचक टीका दीपक केसरकर यांनी केली. राज ठाकरे कोकणात आले तर दुप्पट गर्दी होईल. नारायण राणेंचा पराभव करायला कोकणात गेला तेव्हा तुमच्या उमेदवाराचं डिपॉजिट जप्त झालं होतं. तरीही नंतरच्या काळात कोकण तुमच्या मागे उभा राहिला, असंही ते म्हणाले.
खोटं बोलू नका, नम्र विनंती
शाखाप्रमुखांना वर्षाच्या जवळही फिरकू दिले जात नव्हतं. आज माझ्यावर अन्याय केला असं दाखवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्हीच मुख्यमंत्री राहा असे आमदार शेवटपर्यंत सांगत असताना राजीनामा का दिला? खोटं बोलू नका. खरं बोला, एव्हढीच नम्रपणे विनंती आहे, असं आवाहनही त्यांनी केलं. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयुक्त बरखास्त करण्याची मागणी केली होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांना सुप्रीम कोर्टही मान्य नसतं. प्रत्येकाला बरखास्त करा अशी त्यांना सवय झालीये. जनतेला न्याय देता आला नाही म्हणून तुमचं पद गेलं हे विसरू नका, असा टोला त्यांनी लगावला.
कोरोनात फक्त कुटुंबाची काळजी घेतली
यावेळी माझं कुटुंब, माझी जबाबदारी या उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या मोहिमेवरही त्यांनी टीका केली. माझं कुटुंब, माझी जबाबदारी हे फक्त म्हणण्या पुरतं आहे. कोरोना काळात आतमध्ये दडून होता. नुसतं टीव्हीवर दिसून क्रेडिट घ्यायचं नसतं. आदित्य आज दारोदार फिरताय मात्र कोरोनाच्या वेळी एकदा तरी गेले का? त्यांनाही दडवून ठेवलं होतं. कोरोना काळात तुम्हाला तुमचं कुटुंब महत्त्वाचं होतं, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
शिंदे साहेबांसारख्या बाळासाहेबांच्या कार्यकर्त्याला संपवण्याचा प्रयत्न केला. युवासेनेचे कार्यकर्ते आमच्या आजूबाजूला पहारा देत असताना तुम्हाला काही वाटलं नाही का? त्यांना थांबवण्याची हिंमत तुमच्यात नव्हती. त्यामुळे तुम्हीही बोलू नका म्हणजे आम्हीही उत्तर देणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.