Chandrapur Flood : चिमूरमधील चावडी मोहल्ला भागाला देवेंद्र फडणवीस यांची भेट, शेती-घरे आणि मूलभूत सोयीसुविधांचे मोठे नुकसान
चिमूर शहरातील सर्वाधिक पूरग्रस्त चावडी मोहल्ला भागाला फडणवीस यांनी भेट दिली. या संपूर्ण भागात नागरिकांशी चर्चा करत या भागाची परिस्थिती त्यांनी जाणून घेतली.
चंद्रपूर : जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिमूर तालुक्यात दाखल झाले. गेले 10 दिवस जिल्ह्यातील विविध तालुक्यांना पुराचा तडाखा बसलाय. चिमूर शहरात उमा नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने मोठी हानी झाली आहे. तालुक्याच्या छोट्या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे घरे-शेतीची मोठी हानी झाली. आ. चंद्रशेखर बावनकुळे, आमदार बंटी भांगडीया (Bunty Bhangdia), जिल्हाधिकारी अजय गुल्हाने (Collector Ajay Gulhane) यांची दौ-यात उपस्थित होती. फडणवीस यांनी भिसी येथून सुरुवात करत पिंपळनेरी (Pimpalneri) व अन्य गावात शेतक-यांशी संवाद साधला. गेले दहा दिवस सातत्याने होत असलेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. पेठ गावाशेजारी सखल क्षेत्रात असलेल्या पूल व नाल्यांच्या पुराच्या प्रश्नाकडे स्थायी स्वरूपाचा पर्याय उपलब्ध करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
सर्वेक्षण करण्याचे दिले आदेश
चिमूर शहरातील सर्वाधिक पूरग्रस्त चावडी मोहल्ला भागाला फडणवीस यांनी भेट दिली. या संपूर्ण भागात नागरिकांशी चर्चा करत या भागाची परिस्थिती त्यांनी जाणून घेतली. पुराचे पाणी चढलेल्या व नुकसान झालेल्या नागरिकांशी चर्चा करत दिलासा दिला. यापुढच्या काळात अशी परिस्थिती पुन्हा ओढवू नये यासाठीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यानी प्रशासनाला दिल्या. दौ-याचा समारोप करताना देवेंद्र फडणवीस नुकसानग्रस्त शेती-घरे आणि मूलभूत सोयीसुविधांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगत या सर्वांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. अनेक ठिकाणी लोक सध्याही सुरक्षित स्थळी नेले जात आहेत, या सर्वांची योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचे ते म्हणाले.
पूरग्रस्त नागरिकांशी साधला संवाद
चंद्रपूर जिल्ह्यातील नवेगाव पेठ येथे नाल्याच्या पुरामुळे हानी झालेल्या भागाची आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. बाधित कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केली. त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. त्यानंतर चिमूर शहरातील चावडी भागाला भेट दिली. उमा नदीला आलेल्या पुराने नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करून पूरग्रस्त नागरिकांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. पिंपळनेरी येथे सुद्धा रस्ते आणि पुलांचे नुकसान झाले आहे. नवेगाव पेठ, चावडी, पिंपळनेरी इत्यादी भागात भेटींच्या वेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. किर्तीकुमार उपाख्य बंटी भांगडिया, इतर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.