फटाके फुटले, गुलाल उधळला, विजयी होताच भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले, शिक्षकांनी घेतलेला हा बदला…
शिक्षकांच्या अनुदानाचा जो विषय प्रलंबित होता तो प्रश्नसोडवण्यासाठी मी आझाद मैदानात आंदोलने केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्याकडे रात्रीबेरात्री जाऊन हा प्रश्न सोडवला.
रायगड: कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रचंड धक्का बसला आहे. महाविकास आघाडीचे शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. तर भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. म्हात्रे यांचा विजय होताच भाजपने गुलाल उधळत आणि फटाके फोडून जल्लोष साजरा केला. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांचे आज निकाल लागणार आहेत. या निवडणुकीचा पहिलाच निकाल हाती आला असून हा पहिला निकाल भाजपच्या बाजूने आल्याने भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विजयानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार बाळाराम पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.
मागच्या सहा वर्षात शिक्षक नसलेल्या माणसाने आम्हाला मागे टाकलं होतं. त्यामुळे हा एकप्रकारचा बदला आहे. शिक्षकांनी घेतलेला हा बदला आहे. सहा वर्षात शिक्षकांची कामे झाली नव्हती. त्या उलट मी साडे आठ हजार शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कामे वेळ देऊन केली. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा माझ्या विजयाचा होता, असं ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले.
विश्वास सफल झाला
हा विजय माझा एकट्याचा नसून माझ्या संपूर्ण शिक्षकाचा आहे. गेल्या सहा वर्षापासून मी जे काम केलं त्याची पोच पावती मला मिळाली आहे. तब्बल 33 संघटनांचा मला पाठिंबा होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी माझ्यावर विश्वास टाकला होता. तो सफल झाला, असं म्हात्रे म्हणाले.
हा शिक्षकांचा विजय
रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर आणि उदय सामंत या सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळेच हा विजय झाला आहे. या विभागातील 23 आमदार, 4 खासदार आणि दोन केंद्रीय मंत्री या सर्वांनी माझ्यावर टाकला होता. हा शिक्षकांचा विजय आहे.
33 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा हा विजय आहे. मला 20 हजाराहून अधिक मते मिळाली आहेत. म्हणजे जो कोटा होता तो पहिल्याच फेरीत पूर्ण झाला आहे. अधिकाऱ्यांना भेटून माहिती घेतो, असं त्यांनी सांगितलं.
पेन्शनचा प्रश्न सोडवणार
शिक्षकांच्या अनुदानाचा जो विषय प्रलंबित होता तो प्रश्नसोडवण्यासाठी मी आझाद मैदानात आंदोलने केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्याकडे रात्रीबेरात्री जाऊन हा प्रश्न सोडवला. त्यामुळेच शिक्षकांनी माझ्यावर विश्वास टाकला, असं सांगतानाच आता मला पेन्शनचा प्रश्नही सोडवायचा आहे, असंही त्यांनी सांगितलं.