साईमंदिरात पैसे, दागिने नव्हे या वस्तूचे दान, महाप्रसादाच्या या मेजवानीने साईभक्त तृप्त
साईबाबा यांच्या चरणी काही ना काही दान देतात. ही दानाची परंपरा कायम आहे. कुणी रोख स्वरुपात पैसे देतात. तर कुणी सोने, चांदी साईचरणी अर्पण करतात. पण, एका साईभक्ताने हटके प्रयोग केला.
मनोज गाडेकर, शिर्डी (अहमदनगर) : राज्यातील श्रीमंत देवस्थानांमध्ये पंढरपूर आणि शिर्डीच्या मंदिरांचा समावेश होतो. राज्यासह देश विदेशातून येथे भाविक येतात. मनोकामना पूर्ण होत असल्याने भाविक विठ्ठल असो की साईबाबा यांच्या चरणी काही ना काही दान देतात. ही दानाची परंपरा कायम आहे. कुणी रोख स्वरुपात पैसे देतात. तर कुणी सोने, चांदी साईचरणी अर्पण करतात. पण, एका साईभक्ताने हटके प्रयोग केला. साईभक्तांसाठी त्याने आंबे दान केले. ते थोडे-थोडके नव्हे तर तब्बल अडीच हजार किलो. गेल्या वर्षी तर त्यांनी पाच हजार किलो आंब्यांचे दान केले होते. त्यामुळे हा साईभक्त चर्चेत आलाय.
दीपक सरगळ असे या साईभक्ताचे नाव
साईबाबा हे देश-विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. साईबाबांच्या दर्शनाला आल्यावर साईंच्या झोळीत प्रत्येकजण काही ना काही टाकून जातो. बरेच जण रोख रकमेसह सोने, चांदीचे मोठे दान करतात. मात्र पुणे येथील दानशूर साईभक्ताची बातच न्यारी. दीपक सरगळ असं या साईभक्ताचे नाव आहे.
अडीच हजार किलो आंब्याचे दान
साईंच्या चरणी 2 हजार 500 किलो आंब्यांचे दान त्यांनी केले. साईभक्तांना आज प्रसादभोजनात आमरसाची मेजवानी देण्यात आलीय. मागील वर्षी सुध्दा याच साईभक्ताने 5 हजार किलो आंबे दान केले होते. अशी माहिती साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.
भक्तांनी घेतला आमरसाचा आस्वाद
पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे दीपक सरगळ राहतात. या साईभक्ताने साई संस्थांनला 2 हजार 500 किलो केसर आंबे दान स्वरूपात दिले. साई संस्थानने भोजनालयात या आंब्याचा थंडगार आमरस तयार केला. दिवसभर भाविकांना देण्यात आला. साईभक्तांनी आज आमरसाचा लाभ घेतला. आमरस खाऊन साईभक्तांनी समाधान व्यक्त केलंय.