Nandurbar : डॉ. विजयकुमार गावित यांचं नंदुरबारमध्ये जोरदार स्वागत, शहरातून काढण्यात आली जंगी मिरवणूक
शिंदे-फडणवीस सरकार नुकतंच तयार झालं. त्यात डॉक्टर गावित यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे.
नंदुरबार : बहुप्रतीक्षित असलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर डॉक्टर विजयकुमार गावित पहिल्यांदाच मतदार संघात आले आहेत. त्यामुळे त्यांचे नंदुरबार शहरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी शेकडो भाजपच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात डॉक्टर गावित यांचे स्वागत केले. डॉक्टर गावीत यांनी हनुमान मंदिरात (Hanuman temple) जाऊन दर्शन घेतले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. त्यासोबत कार्यकर्त्यांनी डॉक्टर गावित यांचे औक्षण करत त्यांचं जंगी स्वागत केलं. सुरवातीला शहरातील धुळे चौफुली मोठा मारुती (large Maruti) नगरपालिका स्वारगेट संपूर्ण शहरातून मिरवणूक काढत डॉक्टर गावित यांचे स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या कन्या खासदार डॉक्टर हीना गावित (Dr. Hina Gavit), सुप्रिया गावित आणि अनेक नातेवाईक सोबत होते.
डॉक्टर गावित यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी
तब्बल सात वर्षाच्या प्रतीक्षेनंतर डॉक्टर गावित यांना मंत्रिपद मिळाले. डॉक्टर गावित यांनी 2014 मध्ये मंत्रिपदाच्या राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. त्यानंतर पहिल्यांदा आपल्या कन्येला खासदार म्हणून निवडून आणलं, तर स्वतः आमदार म्हणून विधानसभेवर गेले. त्यावेळेसदेखील आदिवासी चेहरा म्हणून डॉक्टर यांची मंत्रीपदी वर्णी लागेल, अशी जोरदार चर्चा होती. मात्र त्यावेळी त्यांना मंत्रीपद मिळाले नाही. नंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. शिंदे गट बाहेर पडल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार नुकतंच तयार झालं. त्यात डॉक्टर गावित यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे.
आता लक्ष खातं कोणतं मिळणार याकडं
नंदुरबार जिल्ह्यातील भाजपाला मंत्रिपद मिळाल्याने एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील भाजपाचे प्राबल्य वाढेल, अशी शक्यता दिसून येत आहे. मात्र डॉक्टर गावित यांना नेमका कुठल्या खात्याची जबाबदारी मिळेल हे अजून कळू शकलेलं नाही. जिल्ह्यात आदिवासीमंत्री म्हणून डॉक्टर गावित काम पाहतील अशी जोरदार चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. त्यामुळे डॉक्टर गावित यांना कोणता मंत्रीपद मिळतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे.