चंद्रपूर : मालमत्तेचं जास्त मूल्यांकन करून कर्ज वाटप केल्याप्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) तीन अधिकाऱ्यांसह पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे. चंद्रपूरच्या आर्थिक गुन्हे शाखेने (Financial Crime Branch) ही कारवाई केली आहे. अटक झालेल्यांमध्ये शाखा व्यवस्थापक देविदास कुळकर्णी, कर्ज प्रक्रिया अधिकारी विनोद लाटेलवार आणि पंकजसिंह सोलंकी यांचा समावेश आहे. या सोबतच गणेश नैताम या एजंट सह अकरा मालमत्ता धारकांना देखील अटक करण्यात आली आहे. बँकेच्या या फसवणूक प्रकरणात आरोपींनी बनावट आयकर रिटर्न तयार करून आणि मालमत्तांचे जास्त मूल्यांकन दाखवून 44 प्रकारणांमध्ये 14 कोटी 26 लाखांचे कर्जवाटप केले होते. मात्र हे सर्व कर्ज NPA झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजीव कक्कड (Rajiv Kakkad) यांनी 2 वर्षाआधी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती.
या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात आली. मुख्य म्हणजे ज्या लोकांना हे कर्ज देण्यात आले ते कर्जदार अतिशय गरीब आणि सर्वसामान्य असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या लोकांचे खोटे आयकर रिटर्न तयार करून त्यांच्या नावे काही मोठ्या प्रॉपर्टी डीलर्सनी कर्जाची ही रक्कम हडप केल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात बँकेचे आणखी काही अधिकारी आणि प्रॉपर्टी डीलर्स यांना देखील अटक होण्याची शक्यता आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक शेखर देशमुख यांनी ही माहिती दिली. या मोठ्या कारवाईने चंद्रपूरच्या बिल्डर वर्तुळात खळबळ उडाली आहे. सर्व कर्ज NPA झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहाराध्यक्षाने तक्रार केली होती. दोन वर्षाआधी केंद्रीय वित्तमंत्री यांच्याकडे तक्रारीच्या आधारावर चौकशी झाली. या प्रकरणात बँकेचे आणखी काही अधिकारी आणि प्रॉपर्टी डीलर यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये वेता महेश रामटेके, वंदना विजयकुमार बोरकर, योजना शरद तिरणकर, शालिनी मनीष रामटेके, मनीष बलदेव रामटेके, मनीषा विशाल बोरकर, वृंदा कवडू आत्राम, राहुल विनय रॉय, गजानन दिवाकर बंडावार, राकेशकुमार रामकरण सिंग, गणेश देवराव नैताम, गीता गंगादिन जागेट, पंकजसिंह किशोरसिंह सोलंकी, विनोद केशवराव लाटेलवार, देवीदास श्रीनिवासराव कुळकणी यांचा समावेश आहे.