VIDEO : गुरांना ढेप, कुत्र्यांना पोळ्या, मुंग्यांना साखर… वऱ्हाडीही जनावरे; आगळ्यावेगळ्या लग्नाची जिल्हाभर चर्चा
बुलढाण्यातील एक आगळंवेगळं लग्न चर्चेत आलं आहे. एका शेतकऱ्याने आपल्या लाडक्या कन्येचा विवाह दणक्यात पार पडला. या विवाह सोहळ्यात जनावरांच्या अन्न पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती.
बुलढाणा : लग्नाचं बंधन हे पवित्र बंधन मानलं जातं. त्यामुळेच लग्न सोहळा धुमधडाक्यात पार पाडला जातो. प्रत्येकजण आपल्या कुवतीप्रमाणे हा सोहळा दणक्यात घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो. हल्ली इव्हेंट मॅनेजमेंटचा जमाना असल्याने वेगवेगळ्या थीमवर लग्न सोहळे आयोजित केले जातात. आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. बुलढाण्यातील एका शेतकऱ्यानेही आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नाचा सोहळा असाच काहीसा हटके ठेवला. लग्नात वऱ्हाडी मंडळीसाठी सुग्रास भोजन तर ठेवलं होतंच. पण गुरांना कुटार ढेप, कुत्र्यांना पोळ्या आणि मुंग्यांना साखरही ठेवण्यात आली होती. त्या शिवाय अख्ख्या पंचक्रोशीसाठीही जेवण ठेवण्यात आलं. त्यामुळे या लग्नाची चर्चा गावातच नाही तर संपूर्ण जिल्हाभर सुरू आहे.
आपल्या मुलांचा लग्नसोहळा कसा आठवणीत राहील यासाठी वधू-वरांचे वडील जीवाचे रान करतात… आणि तो आठवणीत राहावा यासाठी प्रयत्न करतात… शेतकऱ्याच्या मुलीचा आठवणीत राहील असाच अनोखा लग्नसोहळा पार पडलाय. बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील कोथळी येथील सरोदे कुटुंबीयांनी मुलीच्या लग्न सोहळ्याला आगळेवेगळे स्वरूप दिले. चार एकरात किल्लेदार मंडप टाकून मुलीचा विवाह मोठ्या धडाक्यात पार पडला. विशेष म्हणजे, 10 हजार लोकांना गाव पंगत देत, गावातील गुरांसाठी कुटार, ढेप, कुत्र्यांसाठी पोळ्या तर मुंग्यांसाठी साखरेचा बेत ठेवण्यात आला होता. त्यामुळे या लग्नाची चर्चा जिल्हाभर होत आहे..
शाही विवाहाचं स्वप्न
कोथळी येथील शेतकरी प्रकाश सरोदे यांच्या पूजा नावाच्या मुलीचा विवाह अतुल रमेश दिवाने यांच्याशी काल 7 मे रोजी मोठ्या उत्साहात कोथळी येथे विवाह संपन्न झाला. शेतकरी असलो तरी, मुलीचा शाही विवाह करू असे सरोदे यांचे स्वप्न होते. मुलीच्या लग्नात गावातील जनावरेही उपाशी राहणार नाही, असा संकल्प देखील त्यांनी केला होता. त्यामुळे प्रकाश सरोदे यांनी मुलीच्या विवाहासाठी चार एकर जागेत किल्लेदार मंडप उभारला होता.
जनावरेही लग्नाला
पंचक्रोशीतील गावातील सर्वधर्मीय लोकांना जेवणासाठी चुलबंद आवतण देण्यात आले होते. शिवाय, लग्नात आहेर पद्धत बंद होती. विशेष म्हणजे गावातील गुराढोरांना 3 ट्रॉली कुटार, 10 क्विंटल ढेप, कुत्र्यांसाठी पोळ्या, मुंग्यांना साखर असा जेवणाचा बेत आखला होता. लग्न सोहळ्यात गाव जेवण हे ठरलेलेच असते. परंतु गावातील जनावरांनादेखील पंगत दिल्याने या विवाह सोहळ्याला मुक्या प्राण्यांची सुद्धा उपस्थिती होती.त्यामुळे हा विवाह सोहळा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.