घरगुती कामानिमित्त चालले होते, पण वाटेतच काळाने घातला अन् बाप-लेकीचा…
इंजिनिअर तरुणी सुट्टीनिमित्त गावी आली होती. यावेळी ती वडिलांसोबत कामानिमित्त दुचाकीवरुन चालली होती. मात्र बाप-बेटी पुन्हा घीरी परतलेच नाहीत.
सांगली : घरगुती कामानिमित्त दुचाकीवरुन चाललेल्या बाप-लेकीवर वाटेतच काळाने घाला घातला. दुचाकीला कारने धडक दिल्याने बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शिराळा तालुक्यातील बिऊर येथे घडली. आत्माराम पवार आणि तृप्ती पवार अशी मयत बाप-लेकीची नावे आहेत. बाप-लेकीची अपघाती मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर वडिलांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. बाप-लेकीच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तृप्ती इंजिनिअर असून, सुट्टीनिमित्त गावी आली होती
तृप्ती पवार ही इंजिनियर असून ती पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करीत होती. सुट्टी निमित्त काही दिवसांसाठी ती इस्लामपूर येथे घरी आली होती. दोघे बाप-लेक घरगुती कामासाठी इस्लामपूर होऊन कोकरूडकडे निघाले होते. यावेळी भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात तृप्ती हिचा जागीच मृत्यू झाला, तर आत्माराम पवार गंभीर जखमी झाले.
वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू
पवार यांना शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून त्यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे त्यांचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. या भीषण अपघातामध्ये चारचाकीचेही मोठे नुकसान झाले असून मोटरसायकलचा चक्काचूर झाला आहे. अपघाताच्या आवाजाने शेतात काम करणारी लोकं जमा झाले.
कार आणि बाईक समोरासमोर धडकली
सोलापूरमधील डॉ. अल्पेश खडतरे हे आपल्या कुटुंबासमवेत रत्नागिरीहून सोलापूरला परतत होते. तर पवार बाप-बेटी दुचाकीवरुन कोकरुडकडे चालले होते. यावेळी बिऊरनजीक कार आणि बाईकची धडक झाली आणि यात बापलेकीचा करुण अंत झाला. पवार यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे. अपघाताची माहिती समजताच शिवसेना जिल्हाध्यक्ष आनंदरराव पवार यांच्यासह नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली.