आधी खांद्यावर हात, नंतर टीकास्त्र; तानाजी सावंत यांचा राणा पाटील यांच्यावर निशाणा
आमदार राणा पाटील हे मंत्री सावंत यांचे राजकीय मांडलीकत्व स्वीकारणार का ? की सावंत हे त्यांची आमदार राणा बाबतची भूमिका व शैली बदलणार हे येणाऱ्या काळात पाहावे लागेल.

उस्मानाबाद : आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी भाजप आमदार राणा पाटील यांचे नाव न घेता जिल्ह्याच्या मागासलेपणावर जाहीर भाषणातून टीका केली. कोणाला काय वाटतंय, त्याला मी भीक घालत नाही. मला त्याच काही देणे घेणे नाही. नुसतं बोलणं वेगळं असते. गेली 30-40 वर्ष जिल्हा मागास ठेवला. सत्ता होती ना तुमच्याकडे त्यावेळी काय केले, असा प्रश्न उपस्थित केला. मोठं व खोट रेटून बोलायचं. जनतेची प्रगती होऊ द्यायची नाही. लोक माझ्या मागे राहतील की नाही ? या भीतीमुळे प्रगती व विकास करायचं नाही असं म्हणत सावंत यांनी टीका केली. सत्तेतील भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील व मंत्री सावंत यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मंत्री सावंत हे स्पष्टवक्ते व रोखठोक वक्तृत्व असलेले नेते म्हणून राज्यभर ओळखले जातात. गेल्या 40 वर्षात विकास न झाल्याचा मुद्दा मंत्री सावंत यांनी काढून पाटील कुटुंबाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात थेट टार्गेट केले.
सूचक राजकीय इशारा
या कार्यक्रमापूर्वी त्यांनी शिवजयंती कार्यक्रमात ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना राजकीय कटुता बाजूला ठेवून आदबीने जवळ घेतलं. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून सूचक राजकीय इशारा दिला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात आमदार पाटील यांच्यावर टीका केली.
प्रशासकीय घडामोडी घडल्या
भाजप आमदार राणा पाटील यांनी जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या असमतोल निधी वाटपबाबत पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांची कायद्यावर बोट ठेवत थेट लेखी तक्रार प्रधान सचिवाकडे केली होती. त्यानंतर वादाची ठिणगी पडली. आमदार राणा यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करुन राजकीय मुद्दा न करता तो त्याच्या शैलीने प्रशासकीय पद्धतीने हाताळला. त्यानंतर अनेक प्रशासकीय घडामोडी झाल्या.
विरोधकांवर सुद्धा टीका न करणाऱ्या आमदार राणा यांनी मंत्री सावंत यांची लेखी तक्रार दिल्यामागे भाजपचा ग्रीन सिग्नल असल्याचे बोलले जात आहे. सावंत यांचे जिल्ह्यातील वाढते राजकीय प्रस्थ व हस्तक्षेप याची या वादाला किनार आहे.
राजकीय मांडलीकत्व स्वीकारणार का ?
आमदार राणा पाटील यांना भाजपने मराठवाड्याचे नेतृत्व व चेहरा म्हणून लॉन्च केले आहे. सावंत हे शिंदे गटाचे फायर ब्रँड मंत्री असून सत्ता परिवर्तनाचे संस्थापक आहेत. जिल्ह्याचे नेतृत्व कोणाकडे यावरून पेटलेला हा सुप्त वाद आता सावंत यांच्या आजच्या जाहीर कार्यक्रमातील टीकेमुळे वाढला आहे.
आमदार राणा पाटील हे मंत्री सावंत यांचे राजकीय मांडलीकत्व स्वीकारणार का ? की सावंत हे त्यांची आमदार राणा बाबतची भूमिका व शैली बदलणार हे येणाऱ्या काळात पाहावे लागेल.