खेळता खेळता चिमुकल्याने गिळला खिळा; पोटात दुखल्यानंतर डॉक्टरकडे गेले तेव्हा…
तीन-साडेतीन वर्षांचं मुलं अंगणात खेळत होतं. त्यानं खेळत असताना चक्क लोखंडी खिळा गिळला. पोटात दुखायला लागलं.
नांदेड : लहान मुलं खेळत असताना दंग असतात. आपण काय करतो, याचे कधीकधी त्यांना भान नसते. कुणी माती खातो, तर कुणी आणखीचं काहीतरी तोंडात भरतो. घरच्यांना माहीत झाल्यानंतर ते त्यांना रागावतात. अशीच एक घटना हळदा या गावात घडली. तीन-साडेतीन वर्षांचं मुलं अंगणात खेळत होतं. त्यानं खेळत असताना चक्क लोखंडी खिळा गिळला. पोटात दुखायला लागलं. त्यानंतर ते डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी पोटाच्या तपासण्या केल्या. त्यानंतर काय ते लक्षात आलं.
हळदा गावातील घटना
एका साडेतीन वर्षाच्या मुलाच्या पोटातून खिळा बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. नांदेडच्या कंधार तालुक्यातील हळदा या गावाच्या गणेश येलमिटवार या साडेतीन वर्षाच्या मुलाने अंगणात खेळत असताना लोखंडी खिळा गिळला. ही गोष्ट त्याच्या आईला लक्षात आली.
गणेशला उलट्या होत होत्या
गणेशला उलट्या होत असल्याने नायगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्याच्या पोटात साडेपाच सेंटीमीटर लांबीचा खिळा असल्याचे निदर्शनास आले. तात्काळ गणेशला नांदेडच्या पोटविकार तज्ज्ञ डॉ.कैलास कोल्हे यांच्याकडे रेफर करण्यात आले.
पोटातून खिळा काढला बाहेर
डॉ. आश्विन करे आणि डॉ. पंकज राठी यांच्या मदतीने डॉ. कैलास कोल्हे यांनी तब्बल एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर गणेशच्या पोटातून लोखंडी खिळा बाहेर काढला. खिळा काढण्यासाठी गणेशवर कुठलीही शस्त्रक्रिया करण्यात आली नाही.
मुलांकडे दुर्लक्ष करू नये
येंडोस्कोपीद्वारे हा खिळा गणेशच्या पोटातून बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं. गणेशला कुठलीही जखम झाली नाही.आता गणेशची प्रकृती ठणठणीत आहे. अशा घटना टाळायच्या असतील तर पालकांनी आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करू नये. असे आवाहन डॉ. कैलास कोल्हे यांनी केले आहे.
लहान मुलं घरी असले म्हणजे त्यांची काळजी घ्यावी लागते. कारण चांगलं वाईट त्यांना समजत नाही. काय खायचं काय नाही, हेही कधीकधी कळत नाही. अशावेळी ते काहीतरी प्रयोग करतात. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष ठेवणे गरजेचे असते.