Gadchiroli Flood : गडचिरोलीतील 50 गावांना पुराचा वेढा, जिल्ह्यातील 4 राष्ट्रीय महामार्ग बंद, 11 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले
सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, अहेरी, आरमोरी, देसाईगंज हे तालुके रेडअलर्ट करण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकारी संजय मीना हेलिकॅप्टरनं पूरपाहणी करीत आहेत.
गडचिरोली : जिल्ह्यात गंभीर पूरपरिस्थिती 30 वर्षानंतर पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सात तालुके रेडअलर्ट (Redalert) करण्यात आलेले आहेत. जवळपास 50 गावात पुराचे पाणी शिरले. 11 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. जिल्ह्यातील वैनगंगा (Wainganga), प्राणहिता, गोदावरी (Godavari), इंद्रावती हे चार नद्या धोका पातळीच्या वर वाहत आहेत. सध्या जिल्ह्यातील चार राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बंद पडलेले आहेत. आलापल्ली, आष्टी, चंद्रपूर, राष्ट्रीय महामार्गावर वैनगंगा नदीला पूर आला. चार फूट पाणी राष्ट्रीय महामार्गावरून वाहत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालय पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. गडचिरोली जिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. या पावसाचा फटका अनेक नदी-नाल्यांना व तलावांना बसलेला आहे. सातव्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली. परंतु पूर परिस्थिती गडचिरोली जिल्ह्यात कायम आहे. गडचिरोलीला लागून असलेल्या तलावाला पूर आल्यामुळे पुराचे पाणी महाविद्यालय क्रीडांगणात शिरले.
कोणते राष्ट्रीय मार्ग आहेत बंद
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग पुरामुळे बंद आहेत. सिरोंचा, करिमनगर, हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग ही बंद आहे. गोदावरी नदीला पुराचा फटका बसला. गोदावरी नदीच्या पुलावरून पुलाच्या बाजून राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे. सिरोंचा-आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग जवळपास सहा दिवसांपासून पूर्णपणे बंद आहे. प्राणहिता नदीला पुराचा फटका बसला. आष्टी, आलापल्ली हा राष्ट्रीय महामार्ग ही तीन दिवसांपासून बंद आहे. वैनगंगा नदी परिसरालाही पुराचा फटका बसला. निजामबाद -सिरोंचा जगदलपूर हा महामार्ग इंद्रावती नदीला पूर आल्यामुळे बंद आहे. चामोर्शी, आष्टी, चंद्रपूर हा महामार्ग बंद असून, यावर वैनगंगा नदीला पूर आलेला आहे.
रेडअलर्ट करण्यात आलेले तालुके
सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, अहेरी, आरमोरी, देसाईगंज हे तालुके रेडअलर्ट करण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकारी संजय मीना हेलिकॅप्टरनं पूरपाहणी करीत आहेत. अहेरी येथून दक्षिण भागातील पूरपरिस्थितीची माहिती जिल्हा प्रशासन घेत आहे. गडचिरोली जिल्ह्यात गंभीर परिस्थिती आहे. नागरिकांनी स्वतः सतर्क राहून सेल्फी काढण्यास पूरग्रस्त भाग किंवा नदीकाठी ठिकाणावर जाऊ नये, असा एक व्हाईस मॅसेज जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या प्रत्येक दुर्गम भागात वर्ग करण्यात येत आहे.
ओड्डीगुड्डम पूर्णला पुराचा वेढा
अहेरी तालुक्यातील कमलापूरनजीक असलेल्या ओड्डीगुडम गावात रात्रीच्यावेळी पुराचे पाणी शिरल्याने गावकऱ्यांचे हाल बेहाल झाले होते. सायंकाळपासून पुराचे पाणी वाढत असल्यामुळे गावकऱ्यांनी दुर्लक्ष केलं. परंतु रात्रीच्या वेळी अचानक पाणी वाढल्याने पूर्ण गावकऱ्यांना रामपूर येथे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले. ओड्डीगुडम पूर्ण गावकरी उपाशी असल्याने प्रशासन व गावकऱ्यांनी मिळून रात्री या सर्व पूरग्रस्त नागरिकांना जेवणही दिले. ओड्डीगुड्डम पूर्ण गावाला पुराच्या पाण्याने वेढलेला आहे.