निलेश डाहाट, प्रतिनिधी, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात एक अपघात झाला. या अपघातात अन्न-औषध प्रशासन विभागाचे अधिकारी हे सहकुटुंब ताडोब्याला गेले होते. सोबत पत्नी आणि मुलगी होती. कारने नागपूरकडे परत येत असताना भीषण अपघात झाला. त्यांची अनियंत्रीत कार थेट झाडाला आदळली. यात अधिकारी जागीच ठार झाले. तर, पत्नी आणि मुलगी या जखमी झाल्यात. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने दोन्ही मायलेकीवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
चंद्रपूरच्या अन्न-औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक चंद्रमणी डांगे (वय ५१ वर्षे) यांच्या कारचा अपघात झाला. अपघातात चंद्रमणी डांगे यांचा जागीच मृत्यू झालाय. तर पत्नी सुमना डांगे (वय ४८ वर्षे) आणि मुलगी दिया डांगे (वय २१ वर्षे) किरकोळ जखमी झालेत.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या मोहर्ली येथून आज दुपारी डांगे हे आपल्या परिवारासह नागपूरला जाण्यासाठी निघाले. मात्र चिंधीमाल फाट्याजवळ त्यांचं कारवरून नियंत्रण सुटले. कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेचा अधिक तपास नागभीड पोलीस करत आहेत.
दुसरीकडे, गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव कोहमारा रस्त्यावर कार अनियंत्रित होऊन 70 वर्षीय कार चालकाचा मृत्यू झाला आहे. गोंदियाच्या दिशेने कोहमारा मार्गावरील मोहाडी गावाकडे जात असताना हा अपघात झाला आहे. कार चालकाचे कारवरून नियंत्रण सुटल्याने कार झाडाला जाऊन धडकली.
यात गोंदिया शहरातील 70 वर्षीय कपडा व्यवसायिक श्रीचंद रोहाडा यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी गुरे चारणाऱ्या व्यक्तीच्या समोर हा अपघात घडला. याची माहिती गुरे चारणाऱ्याने पोलिसांना दिली. गोरेगाव पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनाकरिता गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला आहे.