रानटी हत्तींचा धुमाकूळ, कळप आला १४ घरं पाडून गेला, नागरिकांची धावाधाव
हत्तींचा कळप पाहून नागरिक घाबरले. जीवाच्या आकांताने इकडे-तिकडे पळू लागले. हत्तीच्या हल्ल्यात नागरिकांनी कसाबसा आपला जीव वाचला.
व्येंकटेश दुडमवार, गडचिरोली : गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात हत्तींचा एक कळप आहे. कधी-कधी तो आक्रमक होतो. कधी-कधी शांत राहतो. आज पहाटे हा हत्तींचा कळप आंबेझरी या गावात आक्रमक झाला. हे गाव कुरखेडा तालुक्यात येते. हत्तीच्या कळपाने एक-दोन नव्हे तर तब्बलस १४ घरं जमीनदोस्त केलीत. १८ ते २० हत्तींच्या कळपाने हा धुमाकूळ घातला. हत्तींचा कळप पाहून नागरिक घाबरले. जीवाच्या आकांताने इकडे-तिकडे पळू लागले. हत्तीच्या हल्ल्यात नागरिकांनी कसाबसा आपला जीव वाचला. पण, घरं वाचवू शकले नाहीत. घरांची मोठ्या प्रमाणात नासधुस या हत्तीच्या कळपाने केली.
आंबेझरी हे डोंगर आणि घनदाट जंगलाने वेढलेले गाव. आंधळी (सोनपूर) गट ग्रामपंचायत अंतर्गत फक्त ३६ कुटुंब येथे राहतात. आदिवासींच्या या गावात २ ऑगस्ट रोजी पहाटे मोठी दुर्घटना घडली. १८ ते २० च्या संख्येत असलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने हल्ला चढवला. घरांची नासधूस करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरलेल्या नागरिकांनी मुलाबाळांसह घरातून बाहेर पळ काढला.
काही वेळानंतर स्वत:ला सावरत गावकऱ्यांनी टेंभे (आग) पेटवले. हत्तीच्या कळपाला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, हत्तींनी गावकऱ्यांना दाद दिली नाही. धुडगूस सुरूच ठेवला. माहिती मिळताच पुराडा वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी दिघोडे यांनी गावात भेट दिली. घटनेचा पंचनामा केला आहे.
गरिबांना बेघर होण्याची वेळ
हत्तींच्या या हल्ल्यात अनेक घरांची पडझड झाली. संसारोपयोगी साहित्यासह धान्याचे नुकसान झाले. त्यामुळे येथील गरीब कुटुंबांना बेघर होण्याची वेळ आली. अतिदुर्गम गाव असल्याने येथे चार ते सहा महिन्यांचे धान्य साठा करून ठेवतात. मात्र, डोक्यावरचे छत तर गेलेच. पण धान्याचीही नासाडी झाली. त्यामुळे गावकरी हैराण झाले आहेत.
यांच्या घरांचे झाले नुकसान
आंबेझरी येथील आनंदराव हलामी, बारीकराव मडावी, आसाराम मडावी, भाऊदास मडावी, तुकाराम मडावी, सखाराम मडावी, चुन्नीलाल बुद्धे, दिलीप मडावी, लालाजी मडावी, धर्मराव हलामी, शामराव काटेंगे, यशवंत हलामी, रैसू हलामी, मंगरू हलामी यांचा घराची नासधूस झाली. शासनाने अन्नधान्याची सोय करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.