नवरी नऊ अन् नवरदेव पन्नास, नवरी कुणाला कुंकू लावते त्यांनाच माहीत; छोटा पुढारीने उडवली खिल्ली
छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांनी नोटाबंदीपासून ते राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चेवरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. सामान्य जनतेकडे दोन हजाराची नोट नव्हतीच. त्यामुळे केंद्राच्या या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे, असा चिमटा त्यांनी काढला आहे.
परभणी : सध्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वारे वाहत आहेत. नव्या विस्तारात 12 नव्या चेहऱ्यांचा समावेश केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या विस्तारात गोपीचंद पडळकर, प्रवीण दरेकर, मनिषा चौधरी, भरत गोगावले, नितेश राणे आणि मनिषा चौधरी आदींना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मंत्रिमंडळात काही जुन्या चेहऱ्यांचाही समावेश केला जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. येत्या एक दोन आठवड्यात मंत्रिमंडळ विस्ताराचं चित्र स्पष्ट होईल असंही सांगितलं जात आहे. ही सर्व चर्चा असतानाच छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांनी शिंदे सरकारची खिल्ली उडवली आहे.
मंत्रिमंडळ विस्तारची स्थिती अशी झाली की नवरी नऊ, नवरदेव 50, सगळे बाशिंग बांधून बसलेले आहेत. मात्र नवरी कोणाला कुंकू लावते हे त्यांनाच माहीत, अशा शब्दात छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांनी शिंदे सरकारची खिल्ली उडवली आहे. जे मंत्रीपदासाठी शिंदे गटात गेले आता त्यांनाही कळेल की नेमकं मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळेल. जेवढे मंत्री होतील तेवढ्यांच स्वागतच आहे. मंत्रिमंडळची नावे काढायला मी असलो असतो तर सर्वांनाच मंत्री केलं असतं, असं सांगतानाच शहाजी बापूंना मंत्रिमंडळात स्थान मिळाला तर चांगलंच वाटेल, अशी इच्छाही दरोडे यांनी व्यक्त केली.
निर्णयाचं स्वागत करा
घनश्याम दराडे यांनी यावेळी नोटाबंदीवरही टीका केली. केंद्राने 2 हजाराची नोट बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णय सामान्यांना रडू येत नाही आणि हसूही येत नाही. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. त्याचं स्वागत केलं पाहिजे. कारण सामान्यांकडे दोन हजाराची नोटच नव्हती, असा टोलाही त्यांनी लगावला.
एक हजाराची नोट काढा
नोटबंदीमुळे 2024मध्ये निवडणुक लढणाऱ्यांना झटका लागणार आहे. सरकारने 2 हजार ऐवजी दुसरी नोट चलनात आणावी. आर्थिक स्थिती मंद होईल असं काही पाऊल सरकारने उचलू नये, 2 हजार ऐवजी सरकारने परत 1 हजाराची नोट काढावी. 2 हजाराची नोट ठरावीक जनतेसाठी होती. केंद्र सरकारचा हा निर्णय चांगला आहे. मात्र सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये याची सरकारने काळजी घेतली पाहिजे. सरकारने नोटेकडे ध्यान न देता विकासाकडे ध्यान दिला पाहिजे, असं सांगतानाच माझ्याकडे दोन हजाराची एकही नोट नाही, आपल्याकडे केवळ एक बोट आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.