एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे झाले?; गिरीश महाजन यांनी सांगितला माहीत नसलेला किस्सा, म्हणाले, अचानक ऑपरेशन…
आता आपलं सरकार आहे. गेल्या सहा सात महिन्यांपासून राज्यात काम सुरू आहे. आम्ही म्हणतोय साहेब चार तास तरी झोपा. पण ते रात्री 3 वाजेपर्यंत काम करतात.
जळगाव: एकनाथ शिंदे यांनी अचानक शिवसेनेत बंड कसं केलं? एवढे आमदार त्यांच्यासोबत जायला कसे तयार झाले? 40 आमदारांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात खदखद कशी निर्माण झाली? पडद्यामागून भाजप काय हालचाली करत होता? एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद कसं आलं? आदी अनेक प्रश्न अजूनही अनिर्णित आहेत. या प्रश्नांबाबत अजूनही नागरिकांमध्ये कुतुहूल आहे. काही प्रश्नांची उत्तरे नेत्यांच्या भाषणातून मिळत असतात. पण काही अजूनही मिळालेली नाही. यापैकी काही प्रश्नांची उत्तरे राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहेत. सत्तांतर कसं घडलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे झाले यावर महाजन यांनी प्रकाशझोत टाकला आहे.
जळगावात एका सभेला संबोधित करताना गिरीश महाजन यांनी सत्तांतराचा किस्सा ऐकवला. एकनाथ शिंदे कसे मुख्यमंत्री झाले हे कळलं नव्हतं, असं गुलाबराव पाटील म्हणाले. ते खरं आहे. आम्हालाही विश्वास बसला नव्हता. अचानक ऑपरेशनला तर सुरुवात झाली होती. पण एकनाथराव निघाले. ते पुढे गेले. त्यांच्यामागे काही लोक गेले आणि बघता बघता सगळं सैन्य त्यांच्या मागे गेलं. झालं एकदाचं, असं गिरीश महाजन यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
या सर्व गोष्टी जमून आल्या. घडून आल्या. यासाठी चांमुंडा मातेचा आशीर्वाद आमच्यापाठी होता. हे सोप्प नव्हतं. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद होते. हे सोप्पं आहे का एवढं? 40 लोकं उद्धवजींना कंटाळून बाहेर पडताहेत हे सोपं नव्हतं, असं महाजन यांनी सांगितलं.
आम्हाला वाटलं काही खरं नाही. मध्येच ऑपरेशन फेल झालं तर कसं व्हायचं? बरोबर आहे ना…? 40 लोकं जमा करणं सोपं नव्हतं. 17-18 लोकं घेऊन निघायचं आणि 40 पर्यंत मजल गाठायची. 50पर्यंत आपण गेलो. पण सोपं नव्हतं. पुढारी कसे असतात तुम्हाला माहीत आहे. पण सर्व एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत राहीले, असंही त्यांनी सांगितलं.
बुडाला लागलो तर समुद्राची लाट येते आणि ढकलून देते. अशीच लाट आली. ही लाट साधीसुधी नव्हती. तर लाट आली अन् थेट शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरच बसवून दिलं. ते डायरेक्ट मुख्यमंत्री झाले, असं ते म्हणाले.
आता आपलं सरकार आहे. गेल्या सहा सात महिन्यांपासून राज्यात काम सुरू आहे. आम्ही म्हणतोय साहेब चार तास तरी झोपा. पण ते रात्री 3 वाजेपर्यंत काम करतात. अडीच वर्षापूर्वीचा काळ पाहा. तेव्हाचे मुख्यमंत्री घराच्या पायरीतून निघत नव्हते. कॉम्प्युटरवरून काम करत होते. आपले मुख्यमंत्री मात्र उशिरा उशिरापर्यंत जागून काम करतात. हेच खरे जाणता राजा आहेत, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.