राज ठाकरे यांची राज्यपाल कोश्यारींवर जळजळीत प्रतिक्रिया, म्हणाले, पत आहे, पण पोच…
इतिहास रंजित करूनच मांडावा लागतो. पुरावे नसतात. त्यामुळे कल्पना मांडावी लागते. पण ते करताना इतिहासाला डाग लागता कामा नये, लोकांना स्फूर्ती मिळावी यासाठीच हे केलं जातं.
रत्नागिरी: छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. राज्यपालांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने होत असून राज्यपाल हटावच्या मागणीनेही जोर धरला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. राज्यपालांना पत आहे. पण पोच नाही, अशी जळजळीत टीका राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यावेळी ते मीडियाशी संवाद साधत होते.
राज्यपालांना कोणी काही सांगतं की काय असं वाटतं. वाद उकरून काढायचे आणि सर्व फोकस दुसरीकडे वळवायचा असं काही सुरू आहे का असं वाटतं. या मागे व्यूव्हरचना सुरू आहे का? अशी शंकाही येते. माणसाला पत येते, पण पोच येत नाही. त्यांना ती पोच नाहीच, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
शिवाजी महाराजांकडून काही घेऊ नका. फक्त वाद सुरू ठेवा. महाराजांनी जे सांगितलं जे घडवलं ते काही घेऊ नका. फक्त वाद करा. करत बसा म्हणावं. आपलं अपयश झाकण्यासाठी यासर्व गोष्टी काढल्या जातात. अनेक विषय काढले जातात. इतर विषयांवरचं लक्ष डायव्हर्ट होतं. त्यासाठीच हे सुरू आहे, असं ते म्हणाले.
कुणीही उठावं आणि इतिहासावर बोलावं असं करू नका. तुम्ही अॅथोरिटी नाहीये. जी लोकं आहेत त्यांच्याकडून कागदपत्रं तपासा. जे लेखक आहेत, सिनेमा करणारे आहेत. त्यांना भेटा. त्यांच्याशी एकदा बोला. तुम्ही चित्रपट करत आहात त्याबाबतचं तुम्ही कसलं संशोधन करत आहात. कुठून पुरावे घेतले ही माहिती त्यांना विचारा, असंही त्यांनी सांगितलं.
इतिहास रंजित करूनच मांडावा लागतो. पुरावे नसतात. त्यामुळे कल्पना मांडावी लागते. पण ते करताना इतिहासाला डाग लागता कामा नये, लोकांना स्फूर्ती मिळावी यासाठीच हे केलं जातं. त्यासाठीचं चित्रपट हे माध्यम आहे.
तानाजी सिनेमात जे दाखवलं ते सर्वच तसं घडलं होतं का? नाही. मग ते दाखवलं नसतं तर तुम्ही सिनेमा पाहिला असता का? असा सवालही त्यांनी केला.
राज्यातील परिस्थितीबाबत तुम्हाला काय वाटतं? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, अडीच वर्षापासून जवळपास 21-22 महापालिकांच्या निवडणुका पाईपलाईनमध्ये तुंबल्या आहेत.
त्या झाल्यावरच राज्यातील परिस्थिती कळेल. कोरोनामुळे या निवडणुका थांबल्या होत्या. आता कोविड गेला तरी त्या होत नाहीत. का होत नाहीत मला माहीत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, राज ठाकरे यांचं श्वान प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झालं. राज ठाकरे यांनी रत्नागिरी दौऱ्यात डॉली श्वानासोबत वेळ घालवला. त्यामुळे राज यांचं एक वेगळं रुप कार्यकर्त्यांना पाहायला मिळालं.
शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद संपल्यावर बाहेर पडताना राज ठाकरे यांनी डॉली श्वानाला मांडीवर घेऊन त्याला गोंजारले. हे श्वान विश्वराज सावंत याचे आहे.