पवार नाव असलेल्यांना आम्ही घाबरूनच असतो, कारण…, गुलाबराव पाटील यांचं मिश्किल विधान; कारणही भारीच!
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे त्यांच्या मतदारसंघात एका लग्न समारंभाला गेले होते. यावेळी त्यांनी लग्नात भाषण केलं. यावेळी त्यांनी खुमासदार टोलेबाजी करतानाच वधूवरांना आशीर्वादही दिले.
जळगाव : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार असो की विरोधी पक्षनेते अजित पवार असो… दोघांचाही राज्यातच नव्हे तर दिल्लीतील राजकारणातही जबरदस्त दरारा आहे. पवारांच्या शब्दाला राजकारणात प्रचंड किंमत आहे. पवारांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव, अभ्यास आणि अनुभवामुळे सर्वच पक्षाचे नेते त्यांचा सल्ला घेतात. माणसं घडवण्याची जशी किमया त्यांच्याकडे आहे, तशीच त्यांच्या वाट्याला जाणाऱ्यांना धुळीस मिळवण्याची ताकदही त्यांच्याकडे आहे. अजित पवार हे तर जाहीर सभेत सांगून उमेदवाराचा पराभव करतात. म्हणूनच सर्वच त्यांना वचकून असतात. म्हणून तर पवार आडनाव असलेल्यांन आम्ही घाबरूनच असतो, असं राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. आता पाटील हे खरोखरच घाबरून असतात की त्यांनी कोपरखळी लगावलीय हे त्यांचं त्यांनाच माहीत.
पवारांना आम्ही घाबरूनच असतो. कारण पवारांची जी बुध्दी चालते ती कोणाचीच चालत नाही, असं गुलाबराव पाटील म्हणाले. त्यावेळी एकच खसखस पिकली होती. त्याचं असं झालं…मंत्री गुलाबराब पाटील आपल्या बोलण्याच्या शैलीने अनेकांची कोंडी करतात. तसंच अनेकांची मनेही जिंकतात. जळगाव जिल्हातील त्यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात एका लग्नात वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी गुलाबराव पाटील पोहोचले होते.
म्हणून पवारांना सोबत ठेवावं लागतं
या लग्नाच गुलाबराव पाटील यांनी भाषणही केलं. आपल्या खास स्टाईलमध्ये ते बोलले. वधूचं आडनाव पवार असल्याचं त्यांना कुणी तरी सांगितलं. त्यामुळे गुलाबराव पाटील यांनी तोच धागा पकडला आणि टोलेबाजी सुरू केली. आम्ही पवारांना घाबरूनच असतो. कारण तुम्ही सकाळी सकाळी शपथ घेऊन घेता आणि काय करून टाकतात आम्हाला माहीत नाही. त्यामुळे पवारांना कायम बरोबर ठेवावे लागते. कारण पवारांची जी बुद्धी चालते तशी कोणाचीच चालत नाही, असं गुलाबराव पाटील बोलताच लग्नाच एकच हशा पिकला. सर्वांची हसूनहसून मुरकुंडी वळाली.
कार्यकर्त्यांवरून श्रीमंती ठरते
कुंभ राशीचं महत्त्वच वेगळं आहे. गिरीश भाऊ कुंभ, मी कुंभ, संजय पवार कुंभ आणि लावला तुम्ही बंब तिकडं. सांगायचा अर्थ असा की, काकांचं बोलणं स्पष्ट असतं. ते मनाने निर्मळ आहेत. जिथेही ते आहेत, भाईंबरोबर, भाईंच्या आशीर्वादाने त्यांनी या तालुक्यात राजकारण केलं. राजकारण करत असताना त्यांना जे पटलं त्याला होकार दिला. जे नाही पटलं त्याला स्पष्टपणे नकार दिला. अशा सच्चा विचाराचे आणि एकनिष्ठ असे भाई आहेत. तुमच्या मागे तुमचे कार्यकर्ते किती मजबूत आहेत, यावरून तुमची श्रीमंती ठरते. आज त्यांच्या कुटुंबात चांगला सोहळा होत आहेत. विनोदाचा भाग सोडा. हा लग्न सोहळा कोणत्याही पक्षाचा नाही. हा माणुसकीचा सोहळा आहे. घरगुती सोहळा आहे, असं ते म्हणाले.