VIDEO : यू आर रिस्पॉन्सिबल… माझ्यावरील हल्ल्याला तुम्हीच जबाबदार; गुणरत्न सदावर्ते पोलिसांवर भडकले
यावेळी सदावर्ते यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही टीका केली. उद्धव ठाकरे हे बिळातले मुख्यमंत्री होते.
सोलापूर: ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. काही कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्यावर काळी पावडर फेकून त्यांच्या तोंडाला काळं फासलं. अनपेक्षितपणे घडलेल्या या हल्ल्यामुळे गुणरत्न सदावर्ते चांगलेच संतापले आहेत. सदावर्ते यांनी या हल्ल्याचा संपूर्ण राग पोलिसांवर काढला. माझ्यावरील हल्ल्याला तुम्हीच जबाबदार आहात. यू आर रिस्पॉन्सिबल असं म्हणत सदावर्ते यांनी पोलिसांवरच राग काढला. सदावर्ते हे अत्यंत तावातावाने बोलत होते.
गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत मराठा संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे सदावर्ते यांची ही पत्रकार परिषद उधळली गेली. त्यामुळे सदावर्ते हे अत्यंत संतप्त झाले. या हल्ल्यामागे विरोधक असल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यानंतर पोलिसांनी सदावर्ते यांच्या सुरक्षेसाठी त्यांना बसमध्ये बसवलं. बसमध्ये बसल्यानंतर सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीने पोलिसांवरच राग काढला. तुम्ही बेजाबाबदार आहात. यू आर रिस्पॉन्सिबल. तुम्ही त्या हल्लेखोरांसोबत आहात, असा आरोप सदावर्ते यांनी केला. यावेळी सदावर्ते पोलिसांना तावातावाने बोलत होते. पोलीस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. पण सदावर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी पोलिसांवर आगपाखड करण्यास सुरुवात केली.
तुम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचं काम करत आहात, असा आरोपही सदावर्ते यांनी यावेळी केला. तर ज्यावेळी हल्ला झाला तेव्हा तुमचा कोणताही पोलीस घटनास्थळी हजर नव्हता, असं सदावर्ते यांच्या पत्नीने सांगितलं.
यावेळी सदावर्ते यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही टीका केली. उद्धव ठाकरे हे बिळातले मुख्यमंत्री होते. या लोकांना माझी संविधान संवाद यात्रा होऊ द्यायची नाही. त्यामुळेच माझ्यावर हल्ला करण्यात आल्याचं ते म्हणाले.
माझ्या संवाद यात्रेमुळे शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सर्वांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच त्यांना माझा जनतेशी डायलॉग होऊ द्यायचा नाहीये. म्हणूनच हे प्रयत्न सुरू आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.