पूर ओसरला, सर्व्हेक्षण सुरू; या जिल्ह्यात ५ हजार हेक्टर शेतीचे नुकसान
आतापर्यंत चंद्रपूर शहराच्या हद्दीत 1100 पंचनामे पूर्ण झाले. मदतीचेही वाटप करण्यात आले आहे. याच भागातील पूरग्रस्तांची 1 हजार 200 कुटुंबांची यादी तयार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
चंद्रपूर : चंद्रपुरात 20 जुलैपासून अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. आता पुराचे पाणी ओसरल्यावर चंद्रपुरात महसूल विभागाच्या वतीने इरई नदीच्या किनारी ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जात आहे. राज्य आपत्ती निवारण कायद्याच्या निकषांप्रमाणे पीडितांना मदत देण्यासाठी हे अचूक सर्वेक्षण केले जात आहे. आतापर्यंत चंद्रपूर शहराच्या हद्दीत 1100 पंचनामे पूर्ण झाले. मदतीचेही वाटप करण्यात आले आहे. याच भागातील पूरग्रस्तांची 1 हजार 200 कुटुंबांची यादी तयार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
एकूण 3000 कुटुंबांना पूरग्रस्ताची मदत दिली जाण्याचा अंदाज आहे. हे सर्वेक्षण शास्त्रीयदृष्ट्या केल्या केले जाणार आहे. येत्या काळात या संपूर्ण भागामध्ये पुराची नेमकी स्थिती, कारणे आणि उपाय योजना याबाबतही ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर तालुक्यात सुमारे 5 हजार हेक्टर शेतीवर नुकसान झाल्याची माहिती पुढे आली आहे.
पुलाचा पोचमार्ग वाहून गेला
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातल्या पोडसा गावातून तेलंगणात जाणारा महामार्ग ठप्प झालाय. हा उंच पूल वर्धा नदीवर काहीच वर्षांपूर्वी बांधण्यात आलाय. मात्र गेल्या आठ दिवसात वर्धा नदीला आलेल्या महापुराने या पुलाचा पोचमार्ग वाहून गेला. हा तेलंगणाकडे जाणारा चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने बॅरिकेड्स लावून वाहनधारकांना या मार्गावरून प्रवास करण्यास रोखले आहे.
पूल दुरुस्ती केव्हा होणार?
चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने गेल्या काही दिवसात पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. पूल -रस्ते व बंधारे यांना मोठी झळ पोचली आहे. पुढील दोन महिने पावसाचे शिल्लक असताना बंद, खराब झालेले मार्ग – पूल यांची दुरुस्ती कधी होणार याकडे सीमावर्ती भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नांदेडमध्येही पुरामुळे खरडली शेती
नांदेडमध्ये आज जिल्हा जन आंदोलन शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने पीकविमा मंजूर करावा, अशी या मोर्चेकऱ्यांची प्रमुख मागणी होती. पुरामुळे शेती खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, अशीही मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या मोर्चात सहभागी होत शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिलाय.