अकोला : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यसभेची खरी लढाई भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी होणार आहे, असं म्हटलंय. या निवडणुकीच्या (Election) माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी खिळखिळी करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं आंबेडकर म्हणाले. धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीमुळं प्रत्यक्षात भाजप-शिवसेनेतील ही लढत राष्ट्रवादी विरूद्ध भाजप अशी झाली असल्याचंही ते म्हणाले. आपली ताकद कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादीला शिवसेनेचा (Shiv Sena) उमेदवार निवडून आणावाच लागेल, असंही आंबेडकर म्हणाले. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सहावा उमदेवार शिवसेनेचा आणि भाजपचा देखील आहे. भाजपचे सहावे उमेदवार हे राष्ट्रवादीचे यापूर्वीचे खासदार होते. साखर कारखानदारी ( Sugar Industry) आणि सहकाराचाही त्यांना अभ्यास आहे. भाजपनं राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रातील गडाला भगदाड पाडण्याचा यानिमित्तानं प्रयत्न चालवलाय. त्यामुळं ही निवडणूक ही भाजप विरुद्ध शिवसेना असली तरी ती प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी झाली आहे.
राष्ट्रवादीला स्वत:चा गड राखण्यासाठी शिवसेनेचा उमेदवार निवडून आणावा लागेल. कारण तो उमेदवार निवडून न आल्यास भाजपनं राष्ट्रवादीच्या गडात प्रवेश केला असं म्हटलं जाईल. राष्ट्रवादीला पूर्णपणे भाजपला आव्हान देणं सोपं जाईल. केंद्राच्या हातात इथेनॉलचं लायसन्स आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेल्या साखर कारखानदारांना इथेनॉलचं लालूच दाखवून ते त्यांना भाजपकडे घेतील. राष्ट्रवादीला खिंडार पडू शकते. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत आतापर्यंतचा सर्वात मोठा घोडेबाजार होणार असल्याचा गंभीर आरोप आंबेडकरांनी यावेळी केला. राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होणार आहे. आपल्या ऐकण्यात नसेल इतकी किंमत असेल. महाराष्ट्राची जनता हे पाहत आहे असंही आंबेडकर म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी रणकंदन सुरू आहे. भाजप एनसीपीमध्ये भगदाड पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही निवडणूक भाजप वर्सेस एनसीपी अशी होणार आहे. ही निवडणूक एनसीपीसाठी महत्त्वाची आहे. शिवसेनेचा उमेदवार जिंकून आणावाच लागेल. एनसीपीच्या गडात प्रवेश केला जाईल. एनसीपीला चॅलेंज करणे सोपे जाते. घोडेबाजाराची किंमत प्रचंड असेल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.