नवऱ्या मुलीची गाडी थेट मतदान केंद्रावर, आधी मतदान नंतर लग्न, ग्रामपंचायत निवडणुकीचे वाचा आणखी काही किस्से
विटाच्या भाळवणी येथील अंजली जनार्दन शिंदे हिचा आजच विवाह होता. अगदी काही तासावरच अक्षदेची वेळ असतानाच तिने सजवलेल्या गाडीतूनच मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला.
सांगली : सांगली जिल्ह्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. अनेकांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केले. तर दुसरीकडे अक्षदा डोक्यावर पडायला अगदी काही तासच बाकी असताना सजवलेल्या गाडीतून नवरी मुलगी मतदान करायला मतदान केंद्रावर पोहचली. उपस्थिती लावून तीनं आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तर असाच प्रकार जत तालुक्यातील उमदी येथे घडला. नवरोबानी डोक्याला बाशिंग बांधून मतदानाचा हक्क बजावला.
विटाच्या भाळवणी येथील अंजली जनार्दन शिंदे हिचा आजच विवाह आहे. अगदी काही तासावरच अक्षदेची वेळ असतानाच तिने सजवलेल्या गाडीतूनच मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला. एकीकडे आयुष्यभराचा साथीदार मिळाल्याची खुशी आणि दुसरीकडे आपण मतदानातून निवडणारा उमेदवार याचे हास्य तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आले.
दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी येथील विठ्ठल नगर येथील सुनील सातपुते या नवऱ्याने सुद्धा लग्नाच्या आधी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. डोक्यावर बाशिंग बांधून मतदान केंद्रात दाखल होऊन मतदान केले. तर या नवरोबाला बघण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती.
दरम्यान, आज भंडारा जिल्ह्यात 303 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं. यात वयोवृद्धाने देखील प्रकर्षाने सहभाग नोंदविला आहे. पवनीच्या बाम्हनीत 98 वर्षे तर जेवनाळयात 101 वर्षे वयाच्या आजीने मतदान केले आहे.
लाखनी तालुक्याच्या जेवनाळयात 101 वर्षांच्या रड़ू बाई शहारे तर बाम्हणीच्या 98 वर्षाच्या आजी भागरथा जिवतूजी ईखार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकीकडे काही लोक मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून इंजॉय करीत असताना इतक्या वयाच्या आजीने मतदानात भाग घेतला.