गडचिरोलीत अवैध खंडणी वसुली, बोगस बंदुकधारी नक्षलवादी जेरबंद, काय आहे प्रकरण?
नक्षलवाद्यांच्या नावाने खंडणी मागणारे बोगस नक्षलवादीही आहेत. अशाच तीन-चार जणांच्या टोळक्याने आम्ही नक्षलवादी असल्याचं सांगून खंडणी मागितली. ही खंडणी त्यांनी एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मागितली होती. पण, गडचिरोली पोलिसांच्या जाळ्यात ते अडकले. कसे ते वाचा...
गडचिरोली : गडचिरोलीत अवैध खंडणी वसुली प्रकरणी (illegal ransom recovery case) बोगस बंदुकधारी नक्षलवादी (gun-wielding Naxalites) जेरबंद करण्यात आलंय. गडचिरोली पोलिसांनी ही कारवाई केली. व्ही एम मतेरे इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन 25 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी दोन आरोपींना रात्री पोलिसांनी अटक केली. तीन ते चार बंदुकधारी इसमांनी राष्ट्रीय महामार्ग सुरू असलेल्या कामाला धमकावून खंडणी मागितली होती. अहेरी तालुक्यातील गुडगुडम (Gudgudam in Aheri taluka) येथे ही कारवाई करण्यात आली. या दोन आरोपींना पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे चौकशीसाठी हजर करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी व सिरोंचा येथील पोलीस अधिकारी तपास करीत आहेत.
काय आहे प्रकरण
गुडगुडम येथील व्ही एम मतेरे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. जिमेला नाल्याजवळील पुलावर आणून देण्याबाबतची ही मागणी हिरवे ड्रेस घातलेले 3 ते 4 बंदुकधारी इसमांनी केली होती. गडचिरोली पोलीस दलाच्या गोपनीय पथकाने 12 मार्च रोजी जिमेला नाल्याचे पुलाजवळ सापळा रचला. यात अहेरी तालुक्यातील राजाराम (खां) येथील मल्लेश मारय्या आऊलवार (वय 24 वर्ष) व अहेरी तालुक्यातील चेरपल्ली येथील श्रीकांत सोमा सिडाम (वय 20 वर्षे हे नाल्याच्या पुलाजवळ थांबले होते. त्यांना अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
गोपनीय पथकाचे अधिकारी व अंमलदार हे साध्या वेषात गेले. तुम्ही कोण आहात ? असे आरोपींनी विचारले असता अंमलदारांनी आम्ही रोडचे कामावरील मॅनेजर आहोत असे सांगितले. हिरव्या गणवेशधारी इसमांनी ठरविल्याप्रमाणे 25 लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. त्यानंतर गोपनीय पथकाने त्यांना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना न्यायालयाकडून पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणातील इतर आरोपी फरार आहेत. या कारवांमुळे अवैध धंदे करणाऱ्या आरोपींचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.