चंद्रपूर : चंद्रपूरच्या वीज वितरण विभागाने (Power Distribution Department) कडक उन्हाळ्यात वीज पुरवठा सुरळीत ठेवणाऱ्या यंत्रांना थंड ठेवण्यासाठी कुलर्स लावले आहेत. जिल्ह्यात उन्हाची काहिली प्रचंड वाढल्यानंतर विजेच्या मागणीत परमोच्च वाढ होत आहे. अशा स्थितीत थेट उन्हात -अखंड सुरू राहणारी रोहित्रे बंद पडू नयेत यासाठी चक्क कुलर्सद्वारे थंडावा दिला जातोय. या काळात सर्वोच्च मागणीदरम्यान वीज उपकरणांमध्ये होणारा बिघाड म्हणजे तक्रारी व प्रसंगी आंदोलनाचे वळण घेतो. हे टाळण्यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून रोहित्राना थंड ठेवण्यासाठी हे अधिकचे उपाय केले जात आहेत. या उपायाने रोहित्रे थंड राखत वीज पुरवठा सामान्यपणे केला जातो, अशी अधिकार्यांची माहिती आहे. या उपायाने जिल्हाभर विविध वीज उपकेंद्रात रोहित्रे कायम सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. या उपायांची सध्या चांगलीच चर्चा आहे. खबरदारीचा उपाय म्हणून यंत्रांना कुलर्स लावल्याचं रामनगर वीज वितरण केंद्राचे (Ramnagar Power Distribution Center) सहायक अभियंता कुणाल पाटील (Engineer Kunal Patil) यांनी सांगितलं.
चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रसिद्ध कॅफे मद्रास दुकानाला काल आग लागली. हे शहरातील साउथ इंडियन नाश्त्याचे प्रसिद्ध ठिकाण आहे. सकाळी गर्दी असताना अचानक किचनच्या कुलिंग यंत्रणेतून धूर दिसू लागल्यानंतर पळापळ झाली. काही वेळात आगीने रौद्ररूप घेतले. चंद्रपूर शहर मनपाच्या अग्निशमन यंत्रणेने ही आग विझविली. या दुकानाच्या शेजारीच शाळा व मंदिर असल्याने अग्निशमन पथकाला आग वाढण्याची चिंता होती. मात्र अर्ध्या तासातच आग आटोक्यात आणून अग्निशमन पथकाने अभिनंदनीय काम केले. आगीत या जुन्या दुकानाची मात्र मोठी हानी झाली.
विदर्भात सध्या हिट वेव्ह अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढील तीन दिवस पारा 45 अंशापर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. विदर्भात सर्वच शहरांचं तापमान 40 अंशावर गेलंय. चंद्रपुरात तर देशात सर्वाधिक 44.2 तापमानाची नोंद करण्यात आली. नागपूरचा पारा 42 अंशावर गेलाय. जिल्हा प्रशासनानं अलर्ट जारी केलाय. नागपूर महापालिकेनं हिट ऍक्शन प्लान तयार केलाय. त्यानुसार दुपारी 12 ते 3 या वेळेत कामगारांनी काम करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दुपारी सर्व बगीचे सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसेच शासकीय रुग्णालयात शीत कक्षाची स्थापना करण्यात आलीय. तीन दिवसानंतर मात्र उष्ण लाटांपासून दिलासा मिळणार आहे. कारण पावसाची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ भावना एस यांनी वर्तवली.