सायटोमेगालो विषाणूमुळे एकाचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील पहिलीच घटना
अमळनेरच्या नितीन नंदलाल परदेशी (33) या तरुणाला कोरोनानंतर सायटोमेगालो या विषाणूची लागण झाली होती. (jalgaon cytomegalo virus first case)

जळगाव : कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरलेली नाहीये. अजूनही रोज हजारो नवे कोरोनाग्रस्त आढळत आहेत. त्यातच आता जळगाव जिल्ह्यामध्ये सायटोमेगालो (Cytomegalo virus) विषाणूची लागण झाल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अमळनेरच्या नितीन नंदलाल परदेशी (33) या तरुणाला कोरोनानंतर सायटोमेगालो या विषाणूची लागण झाली होती. त्यानंतर पोस्ट कोरोनात सायटोमेगालो व्हायरसची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला. सायटोमेगालो विषाणूमुळे दगावलेला जळगावमधील हा पहिलाच रुग्ण असावा, असा अंदाज व्यक्त केला जातोय. (Jalgaon Nitin Pardeshi patient of Cytomegalovirus died first case of Jalgaon)
कोरोनावर यशस्वी उपचार, नंतर पुन्हा ताप
मागील काही दिवसांपूर्वी नितीन परदेशी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांनी अमळनेरमध्ये कोरोनावर उपचार घेतले होते. यशस्वी उपचार घेऊन परदेशी घरीसुद्धा परतले होते. मात्र, त्यांना पुन्हा ताप आला. त्यानंतर ऑक्सिजनची पातळी खालावल्यामुळे परदेशी यांना जळगावच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
प्रकृती खालावल्यामुळे 25 दिवस उपचार
मात्र तरीही प्रकृती खालावत असल्याने तसेच व्हेंटिलेटरची गरज भासत असल्याने परदेशी यांना डॉ. नीलेश किनगे यांच्या ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर या रुग्णालयात 25 दिवस उपचार करण्यात आला. अखेर सोमवारी रात्री उशिराने त्याची प्राणज्योत मालवली.
गेल्या काही दिवसांपासून नितीन परदेशी यांची ऑक्सिजन पातळी घसरत होती. त्यातच त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली होती. त्यानंतर त्यांना सायटोमेगालो व्हायरसशी संबधित औषधे देण्यात येऊ लागली. मात्र प्रकृती बिघडतच गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. सायटोमेगालो हा नवीन विषाणू नाही. मात्र कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेकांची रोग प्रतिकारशक्ती खूपच कमी होते. त्यातूनच परदेशी यांना सायटोमेगालो व्हायरसची लागण झाल्याचे समोर येत आहे.
काय आहे सायटोमेगालो विषाणू?
सायटोमेगालो हा विषाणू अनेकदा सदृढ व्यक्तींच्या शरिरात निष्क्रीय अवस्थेत असू शकतो. मात्र रुग्णाची रोगप्रतिकार क्षमता कमी झाली की, तोदेखील ॲक्टिव्ह होतो. यात रुग्णाला अंगावर पुरळ येणे, ताप येणे, ऑक्सिजन पातळी कमी होणे, यासारखी लक्षणे दिसून येतात. तसेच शरीराच्या कोणत्याही भागात इन्फेक्शन होऊ शकते, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.
इतर बातम्या :
कोरोना विषाणू फुफ्फुसांना कसा पोखरतो? वैज्ञानिकांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली
कोरोना पुढील काळात आणखी धोकादायक, परिस्थिती बिघडू शकते, बिल गेटस यांचा इशारा
(Jalgaon Nitin Pardeshi patient of Cytomegalovirus died first case of Jalgaon)