भाड्याची खोली पुराने भरली, पानटपरी चालवणारी आजी पुरती खचली, गाळ उपसायलाही त्राण नाही
कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur flood) आलेला महापूर आता ओसरायला सुरुवात झाली. मात्र पाणी जस जसं कमी होतंय तस तसं या महापुराने (Kolhapur rain) घातलेल्या थैमानाची विदारक दृश्य सुद्धा समोर येत आहेत.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur flood) आलेला महापूर आता ओसरायला सुरुवात झाली. मात्र पाणी जस जसं कमी होतंय तस तसं या महापुराने (Kolhapur rain) घातलेल्या थैमानाची विदारक दृश्य सुद्धा समोर येत आहेत. 2019 च्या महापुरानंतर मोठ्या कष्टाने सावरलेले अनेकांचे संसार यावेळी पुन्हा एकदा पंचगंगेच्या पाण्यात वाहून गेले. त्यामुळे आता पुन्हा यातून उभारी घेण्याची शक्ती त्यांच्यामध्ये उरलेली नाही.
घोटाभर पाण्यात अस्ताव्यस्त पडलेली भांडी, नासधूस होऊन विखुरलेलं प्रापंचिक साहित्य आणि त्यातून वाट काढत पाणावलेल्या डोळ्यांनी हे सगळं पाहणाऱ्या पार्वती वडणगेकर. शाहूपुरी कुंभार गल्ली भागात पार्वती वडणगेकर राहत असलेल्या भाड्याच्या खोलीची महापुराने अशी अवस्था केली. पती आणि मुलांचं निधन झाल्यामुळे पार्वती आजी एकट्या शाहूपुरीतील या छोटेखानी खोलीत राहतात. याच भागातील पंचमुखी गणेश मंदिर भागात आजींची पानपट्टी आहे. वृद्धापकाळामुळे शरीर साथ देत नसतानाही पानपट्टीत चालवून त्याचा उदरनिर्वाह करतात. हातावर पोट असलेल्या या आजींच्या घराची महापुराने ही अवस्था केली. 2019 पेक्षाही जास्त पाणी यावेळी घरात शिरल्याने घरातील सगळ्याच साहित्याचं अक्षरशः भंगार झालं आहे. घराची ही अवस्था पाहून खराब झालेलं साहित्य बाहेर काढायचं त्राणही त्यांच्यात उरलेलं नाही.
पानपट्टीत भरलेला मालही गेला
कोरोना लॉकडाऊनमुळे कोल्हापुरातील बंद असलेली दुकानं आत्ताशी उघडली होती. जमवलेली पुंजी कोरोना काळात संपल्याने, उसनवारीवर पैसे घेऊन पार्वती आजींनी पानपट्टीत 40 हजारांचा माल भरला होता. मात्र दुर्दैवानं पानपट्टीसुद्धा पुराच्या पाण्यात बुडाल्याने या मालाचं सुद्धा नुकसान झालं. महापुराने केलेल्या दुहेरी नुकसानीमुळे पार्वती आजी पुरत्या खचल्या आहेत.
पार्वती आजींसारखीच अशी अनेक कुटुंब महापुराने उद्ध्वस्त केली आहेत. पूर ओसरल्यानंतर आता कोल्हापुरातील गल्ल्यांमधील चिखल आणि दुर्गंधीयुक्त वास्तव समोर यायला लागलं आहे. पुढच्या काळात रोगराईचा धोकाही या सगळ्या भागांमध्ये आहे.
संबंधित बातम्या